काळजी घ्या! कोरोनापाठोपाठ आता डेंगी प्रादुर्भावाची चिंता; शहरात सापडले १३ रुग्ण

विक्रांत मते
Saturday, 19 September 2020

नागरिकांनी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तर सारडा सर्कल, महामार्ग तसेच गॅरेजेसच्या ठिकाणी असलेले निकामी टायर्स हटविण्याचे आवाहन करण्यात आले असून अन्यथा कारवाई केली जाणार आहे. 

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता डेंगीचा आजार उदभवण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंगी नियंत्रणात असला तरी कोरोनाशी लढा देताना नागरिकांना डेंगीपासून देखील काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये डेंगीचे तेरा रुग्ण शहरात आढळून आले आहेत. दुसरीकडे समाधानकारक बाब म्हणजे स्वाइन फ्लू, चिकनगुनिया व मलेरिया या आजारांचा शहरात अद्याप शिरकाव झालेला नाही. 

यावर्षी आठ डेंगी बाधित

पावसाळा सरत आल्यानंतर शहरात दरवर्षी डेंगी किंवा स्वाइन फ्लूचा आजार तोंड वर काढतो. गेल्या पाच वर्षाचा शहराच्या आरोग्याचा आलेखावर नजर टाकली असताना दर दोन वर्षांनी डेंगी किंवा स्वाईन फ्ल्यू आजार तोंड वर काढतो. गेल्या वर्षी स्वाइन फ्लू बरोबरच डेंगीचा प्रादुर्भाव झाला होता. यंदा आता त्यात कोरोनाचा समावेश झाला आहे. कोरोना पाठोपाठ डेंगीचा चोर पावलाने शहरात प्रवेश झाला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत बाधितांची संख्या फारच कमी आढळून येत आहे. सन २०१९ मध्ये जुन महिन्यात डेंगीचे दोन रुग्ण आढळले होते. यावर्षी आठ डेंगी बाधित सापडले. 

या आजाराचे रुग्ण नोंद नाही..

गेल्या वर्षी जुलै महिन्यात ४८ रुग्ण आढळले होते यंदा चौदा डेंगी बाधित आढळले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ११७ रुग्ण आढळले होते, यंदा २८ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात १६५ रुग्ण आढळून आले होते यंदा मात्र पहिल्या पंधरवड्यामध्ये तेरा रुग्ण आढळून आले होते. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत ३४२ रुग्ण शहरात आढळले होते. यावर्षी १२८ रुग्ण आढळले आहे. यंदा स्वाइन फ्लू, चिकनगुनिया, मलेरियाच्या एकाही रुग्णाची नोंद शहरात झालेली नाही. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

अन्यथा कारवाई 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापलिकेने स्वच्छतेला महत्व दिले आहे. त्यामुळे निकामी टायर्स, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रीज, कुलर्सच्या ट्रे मध्ये स्वच्छता पथकांकडून पाहणी केली जाणार आहे. नागरिकांनी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तर सारडा सर्कल, महामार्ग तसेच गॅरेजेसच्या ठिकाणी असलेले निकामी टायर्स हटविण्याचे आवाहन करण्यात आले असून अन्यथा कारवाई केली जाणार आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue patients have been found in Nashik city nashik marathi news