संशय बळावला! देवळाली टीडीआर घोटाळ्यातील फाइल गायब; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

विक्रांत मते
Wednesday, 23 September 2020

याप्रकरणी शासनाकडून चौकशी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २२) ॲड. सहाणे व श्री. बुडगुजर यांनी घोटाळ्यासंदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्याकडे माजी आयुक्त मुंढे यांच्या काळात शहा कुटुंबातील स्नेहा यांना पाठविलेल्या नोटीससंदर्भात माहिती मागितली.

नाशिक : देवळाली शिवारातील बहुचर्चित सर्व्हे क्रमांक २९५ मधील आरक्षित जागा ताब्यात घेताना शासनाकडे भरलेला नजराणा, स्टॅम्प ड्यूटी व प्रत्यक्षात आरक्षित जागेचा सुमारे २५ हजारांचा टीडीआर महापालिकेकडून वसूल करून शंभर कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी शासनाच्या नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देवळाली टीडीआर

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सूचनेवरून तत्कालीन नगररचनाचे सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांनी शहा परिवारातील सदस्यांना पाठविलेली नोटीस घोटाळ्याचा प्रबळ पुरावा ठरत असताना नेमकी नोटीस दिल्याची फाइलच गायब झाली आहे, असा प्रकार चौकशी समितीच्या सदस्यांनी सांगितल्याने घोटाळ्याचा संशय बळावला आहे. घोटाळ्यासंदर्भात शासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत शासनाने चौकशीचे आदेश दिले. त्यापूर्वी ॲड. शिवाजी सहाणे व मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला. याप्रकरणी शासनाकडून चौकशी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २२) ॲड. सहाणे व श्री. बुडगुजर यांनी घोटाळ्यासंदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्याकडे माजी आयुक्त मुंढे यांच्या काळात शहा कुटुंबातील स्नेहा यांना पाठविलेल्या नोटीससंदर्भात माहिती मागितली. त्या वेळी नोटीसची फाइलच गायब असल्याचे उत्तर देण्यात आले.

काय आहे प्रकरण?

मौजे देवळालीगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील आरक्षण क्रमांक २२० व २२१ या जागेवर शाळा, खेळाचे मैदानाचे आरक्षण होते. एकूण १५,६३० चौरसमीटर क्षेत्राचा टीडीआर देताना सिन्नर फाटा येथील आरक्षित जागेऐवजी नाशिक रोडच्या बिटको चौक ते उड्डाणपुलापर्यंत जागा दर्शविली. मूळ मालकांनी आरक्षित जागा मोफत देण्याचे लिहून दिले असताना टीडीआर दिला. महापालिकेने संबंधित जागामालकांना जागेचा सरकारी बाजारभाव ६,९०० रुपये प्रतिचौरस मीटर असताना टीडीआर देताना जागेचा दर २५,१०० प्रतिचौरस मीटर दर्शवून टीडीआर सर्टिफिकेट दिल्याने महापालिकेला ७५ कोटींचा भुर्दंड बसला.

नोटिशीत काय होते?

२०१८ मध्ये तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांनी ज्यांच्या नावावर टीडीआर घेतला त्या स्नेहा शहा यांना नोटीस पाठवून ७,१४० रुपये प्रतिचौरस मीटर जागेची किंमत असताना २५,१०० रुपये प्रतिचौरस मीटर जागेची किमत दर्शविली. त्यामुळे महापालिकेला सुमारे २३ कोटींची जागा परत करावी, असे नोटिशीत म्हटले होते. ती नोटीस गायब झाल्याने चौकशी समितीचे सदस्यांची भूमिका संशयात सापडली आहे.

नस्ती ताब्यात घ्या : शिवसेनेचे पत्र

नोटीस गायब झाल्याबाबत प्रशासन उपायुक्त घोडे-पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आयुक्त कैलास जाधव यांना पत्र लिहिले असून, टीडीआर घोटाळ्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन स्वतःच्या कस्टडीमध्ये ठेवावी. चौकशी समितीच्या सदस्यांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली.

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

टीडीआर घोटाळ्यासंदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांना चर्चेसाठी बोलाविले असून, याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल.
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

हेही वाचा >  "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन : रमेश चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deolali TDR scam file missing nashik marathi news