esakal | कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड! उत्पादन खर्च तिप्पट झाल्याने वाढल्या अडचणी
sakal

बोलून बातमी शोधा

onion planting

या सप्ताहात नाशिक विभागात ८१ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर लेट खरीप कांदा लागवडी झाल्याचे कृषी विभागाच्या माहितीवरून समोर आले आहे. या वर्षी सुरवातीच्या खरीप कांदा लागवडी झाल्या असल्या तरी करपाजन्य रोगांमुळे लागवडी अडचणीत सापडल्या

कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड! उत्पादन खर्च तिप्पट झाल्याने वाढल्या अडचणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : बियाण्यांची टंचाई, त्यात अतिवृष्टीमुळे रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात खरीप कांदा लागवडी अडचणीत सापडल्या होत्या. मात्र नंतरच्या टप्प्यात कांदा रोपवाटिकांचे नुकसान घटले असले तरी प्रतिकूल परिस्थितीत टप्प्याटप्प्याने उशीरा खरीप कांदा लागवडी होत आहेत. 

या सप्ताहात नाशिक विभागात ८१ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर लेट खरीप कांदा लागवडी झाल्याचे कृषी विभागाच्या माहितीवरून समोर आले आहे. या वर्षी सुरवातीच्या खरीप कांदा लागवडी झाल्या असल्या तरी करपाजन्य रोगांमुळे लागवडी अडचणीत सापडल्या. मात्र लेट खरीप कांद्याच्या लागवडी टप्प्याटप्प्याने होत आहेत. बियाण्यांची टंचाईमुळे सध्या रोपांची उपलब्धता सर्वसाधारण आहे. कांदारोपे उपलब्ध करून लागवडी पूर्ण करण्यासाठी कांदा उत्पादकांचा कल दिसून येत आहे. मात्र प्रस्तावित लागवडी पूर्ण होऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे या वर्षी कांदा हंगाम अजूनही अडचणींचा ठरतो आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

हंगामाची स्थिती 

- खरीप कांद्याच्या लागवडी झाल्या. मात्र त्या विरळ झाल्याने अडचणीत वाढ 
- महागडी बियाणे खरेदी करून लेट खरीप कांद्याच्या रोपवाटिकांची निर्मिती 
- रोपांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने कांदा लागवड 
- करपाजन्य व बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने पीक संरक्षण खर्चात वाढ 
- खरीप कांदा काढणी तुरळक, त्यात उत्पादनात मोठी घट 
- तुरळक प्रमाणात उन्हाळ कांदा लागवडी सुरू 


चालू वर्षी खरीप कांदा हंगाम अडचणींचा ठरत आहे. कांदा बियाण्यांचा वाढलेला दर, त्यात रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने लागवडी पूर्ण झाल्या नाहीत. खर्च वाढला आहे, तर कांद्याचे उत्पादन व प्रतवारी जेमतेम असल्याने खर्च करून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, अशी स्थिती आहे. 
- नंदकुमार उशीर, कांदा उत्पादक, धोडांबे (ता. चांदवड) 

खरीप कांदा लागवडीत ४० टक्क्यांपर्यंत अडचणी आहेत. ज्यामध्ये काळा व जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक होता. मात्र सध्या लेट खरीप लागवडीत प्रादुर्भाव तुलनेत कमी आहे. त्यामुळे पिकाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी शिफारशीनुसार फवारण्या घेऊन रोग नियंत्रण करावे. 
- डॉ. राकेश सोनवणे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) 
 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

नाशिक विभागातील कांदा लागवडीची स्थिती 

जिल्हा...खरीप कांदा ...लेट खरीप कांदा...एकूण लागवडी 
नाशिक....२३०७८...७०१२७...९३२०५ 
धुळे...४४९६...३२१८...७७१४ 
जळगाव...११७९...८२७५..९४५४ 
नंदुरबार...२५४०...६०...२६००