मालेगावला किरकोळ वादातून थेट गोळीबार; केबल व्यावसायिकासह दोघेजण जखमी

प्रमोद सावंत
Sunday, 18 October 2020

शनिवारी (ता. १७) सायंकाळी किरकोळ वादातून एका सराईत गुन्हेगाराने केबल व्यावसायिक तरुणावर गोळी झाडली. यात केबल व्यावसायिकासह दोघेजण जखमी झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. गोळीबाराचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. वाचा काय घडले नेमके?

नाशिक : (मालेगाव) शहरातील पवारवाडी भागातील अन्सार सायजिंग कम्पाऊंडजवळील रस्त्यावर शनिवारी (ता. १७) सायंकाळी किरकोळ वादातून एका सराईत गुन्हेगाराने केबल व्यावसायिक तरुणावर गोळी झाडली. यात केबल व्यावसायिकासह दोघेजण जखमी झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. गोळीबाराचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

शहरातील नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक सुरु असतानाच गोळीबाराच्या या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुदस्सीर नामक गुन्हेगाराने गावठी बंदुकीतून गोळ्या झाडल्याने शेख गुफरान इब्राहीम उर्फ केबलवाला व शेख सलमान सिराज अहमद हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संशयित मुदस्सीर, जखमी दोघे व अन्य काही संशयित या रस्त्यावर आपसात चर्चा करीत असतानाच त्यांच्यात वाद झाले. या वादातूनच गोळीबाराचा हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

गावठी बंदूक व अवैध शस्त्रसाठा

गेल्या वर्षभरापासून महिनाभराच्या अंतराने शहरात सातत्याने किरकोळ वादातून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. पोलिसांना अवैध व्यवसायांना आळा घालण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी गुन्हेगार मात्र डोके वर काढत आहेत. गेल्या आठवड्यात जेलमधून सुटलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या स्वागताचे फलक लावून त्याच्या सुटकेचा जल्लोष करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. शहरातील गुन्हेगारांकडे मोठ्या प्रमाणावर गावठी बंदूक व अवैध शस्त्रसाठा आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतानाच हा शस्त्रसाठा हुडकून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Direct firing on Malegaon from a minor dispute nashik marathi news