शहरातील कचरा संकलनाचे दोन्ही ठराव विखंडित करा - महापौर शेख

प्रमोद सावंत
Wednesday, 7 October 2020

शहरातील वॉटरग्रेस प्रॉडक्टस कंपनीचा कचरा संकलनाचा ठेका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कचरा पेटला असून, वॉटरग्रेसला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव गुरुवारी (ता. ८) स्थायी समितीच्या सभेत ठेवला आहे.

नाशिक : (मालेगाव) आयुक्तांनी ३१ जुलै २०२० चा स्थायी समितीचा वॉटरग्रेसला दहा वर्षे मुदतवाढ देण्याचा ठराव विखंडित करण्यास पाठविला आहे. त्याचवेळी त्यांनी २८ नोव्हेंबर २०१९ चा स्थायी समितीचा ठरावही विखंडित करण्यास पाठवावा, सदस्यांची दिशाभूल थांबवावी, असे सांगतानाच मनपा आयुक्तांविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचा निर्धार कायम असल्याचे महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, माजी महापौर रशीद शेख यांनी सोमवारी (ता. ५) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

आयुक्तांच्या कामकाजाबद्दलही सर्वपक्षीय सदस्य नाराज

महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेख, श्री. आहेर म्हणाले, की आयुक्तांनी वॉटरग्रेसचा दहा वर्षे मुदतवाढीचा ठराव विखंडित करण्यास पाठविला असल्यास त्याचे स्वागतच आहे. मात्र रविवारी सुटी असताना त्यांनी जावक क्रमांक न टाकताच महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मुश्‍तकिम डिग्निटी यांना ठराव विखंडित करण्यास पाठवित असल्याची प्रत दिली. त्यामागे त्यांचा हेतू चांगला नाही. अविश्‍वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर महागठबंधन आघाडीच्या सदस्यांची मने वळविण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. वॉटरग्रेस संदर्भात सर्वपक्षीय सदस्यांचा तक्रारी आहेत. आयुक्तांच्या कामकाजाबद्दलही सर्वपक्षीय सदस्य नाराज आहेत. स्थायी समितीत २८ नोव्हेंबर २०१९ ला प्रतिवर्षी कचरा संकलनात तीन टक्के वाढ करण्याचा ठराव करताना ३१२ टन कचरा उचलला जात असूनही ताशेरे ओढले आहेत. 

प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेणे आवश्‍यक

त्याचवेळी तीनशेपेक्षा अधिक टन कचरा उचलूनही कचरा शिल्लक राहत असल्याने वाढीव कचरा संकलन व मुदतवाढ देण्याचा ठराव केला आहे. या ठरावात नवीन निविदा काढल्यास सुधारित दरानुसार डिझेल, कामगार व अन्य यंत्रणेचा खर्च वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवून मुदतवाढीचा ठराव केला आहे. या ठरावावर रशिदा अब्दुल मन्नान यांची सूचना असून, मोहंमद सुभान अय्युब यांचे अनुमोदन आहे. आयुक्तांनी ३१ जुलैच्या ठरावाबरोबरच २८ नोव्हेंबरचा ठरावही विखंडितसाठी पाठवावा. या ठरावांचा आधार घेऊन संबंधित न्यायालयात जाऊ शकतील. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे श्री. व सौ. शेख यांनी सांगितले. 

हेही वाचा > भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

अविश्‍वास प्रस्तावावर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहेत. शिवसेना-भाजप यांसह विरोधी महागठबंधन आघाडीनेही या प्रस्तावावर सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आयुक्त मात्र गटनेते व प्रमुख सदस्यांच्या भेटी घेऊन बदली करून घेणार असल्याचे सांगत आहेत. त्यांना चांगल्या कामासाठी सदिच्छा! - रशीद शेख, माजी महापौर, महापालिका, मालेगाव  

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dismantle both resolutions of waste collection - Mayor Sheikh nashik marathi news