बागलाण तालुक्यात विक्रमी ३१ कोटींचे पीककर्ज वाटप 

प्रशांत बैरागी 
Thursday, 8 October 2020

जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या लक्षांकपेक्षा अधिक कर्जवाटप करून जिल्हा बँकेने ‘शेतकऱ्यांची बँक’ अशी ओळख कायम ठेवली. तीन वर्षांत नोटाबंदी व थकबाकी वसुलीमुळे बँकेची आर्थिक स्थिती ढासळली होती.

नाशिक/ नामपूर : सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेत सहा महिन्यांत ३० सप्टेंबरअखेर बागलाण तालुक्यात सहकारी सोसायटींच्या माध्यमातून ३१ कोटी २१ लाखांच्या पीककर्जाचे शेतकऱ्यांना वाटप केले.

तीन हजार २४४ सभासदांना कर्ज वाटप

जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या लक्षांकपेक्षा अधिक कर्जवाटप करून जिल्हा बँकेने ‘शेतकऱ्यांची बँक’ अशी ओळख कायम ठेवली. तीन वर्षांत नोटाबंदी व थकबाकी वसुलीमुळे बँकेची आर्थिक स्थिती ढासळली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पीककर्ज वाटप होऊ शकले नव्हते. परंतु यंदा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यास प्राधान्य दिल्याने शेतकरीराजा सुखावला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी खरीप हंगामांतर्गत जिल्हा बँकेला ४३४ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. महाआघाडी सरकारने यंदा महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे जिल्हा बँकेला ७८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने बळीराजा सुखावला आहे. बागलाण तालुक्यात तीन हजार २४४ सभासदांना सुमारे २० कोटींचे पीककर्ज वाटप झाले. यंदाच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे खरीप पीककर्ज वाटपाला वेग आला. या रकमेतून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाचे काम तालुक्यातील सुमारे १०० विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून केले. याकामी जिल्हा बँकेचे बागलाणचे संचालक सचिन सावंत, विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे, सर्व शाखाधिकारी, बँकेचे निरीक्षक, कर्मचारी यांनी प्रयत्न केले. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

बागलाण तालुक्यासाठी पीककर्ज वाटपासाठी २५ कोटींचे उद्दिष्ट असताना विक्रमी ३१ कोटींच्या कर्जाचे वाटप झाले आहे. रब्बी हंगामासाठी दहा कोटींचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बँकेच्या समोपचार कर्ज परतफेड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना व्याजात ५० टक्के सूट दिल्याने तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आठ कोटी ७४ लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेने समोपचार योजनेस ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
- सचिन सावंत, संचालक, एनडीसीसी बँक, बागलाण 

 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of record 31 crore crop loans in Baglan taluka nashik news