आठ वर्षांनंतर डोंगरगाव तलाव ओव्हरफ्लो! येवल्यात पिकांचे प्रचंड नुकसान करत पावसाचा नवा विक्रम 

संतोष विंचू
Saturday, 26 September 2020

एकेक थेंबासाठी चातकासारखी प्रतीक्षा करायला लावणाऱ्या वरुणराजाने यंदा दुष्काळी तालुक्यावर सुरवातीपासून कृपा केल्याने पावसाचे अनेक नवीन आकडे आज दिसत आहेत. विशेष म्हणजे मांजरपाड्याच्या पाण्याने भरण्याची प्रतीक्षा असलेला डोंगरगाव पाझर तलाव यंदा पावसाने ओव्हरफ्लो झाला असून, आठ वर्षांनंतर, तर गेल्या वीस वर्षांत फक्त चौथ्यांदाच हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे सांगितले जाते. 

नाशिक / येवला : एकेक थेंबासाठी चातकासारखी प्रतीक्षा करायला लावणाऱ्या वरुणराजाने यंदा दुष्काळी तालुक्यावर सुरवातीपासून कृपा केल्याने पावसाचे अनेक नवीन आकडे आज दिसत आहेत. विशेष म्हणजे मांजरपाड्याच्या पाण्याने भरण्याची प्रतीक्षा असलेला डोंगरगाव पाझर तलाव यंदा पावसाने ओव्हरफ्लो झाला असून, आठ वर्षांनंतर, तर गेल्या वीस वर्षांत फक्त चौथ्यांदाच हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे सांगितले जाते. 

येवल्यात पिकांचे प्रचंड नुकसान करत पावसाचा नवा विक्रम 
तालुक्यात ऑगस्टवगळता जुलै व सप्टेंबरमध्ये विक्रमी प्रमाणात पाऊस झाल्याने आतापर्यंत तब्बल ६७१ मिमी पाऊस नोंदला आहे. दोन आठवड्यांत पाच ते सहा वेळा आलेल्या पावसाने खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. कांद्याची शेतातच सडवणूक होत असून, रोपे मृत होऊन वाफे रिकामे होत असल्याने शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. किमान आठवडाभर तरी पावसाने उघडीप देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मका, बाजरी, सोयाबीन सोंगणीच्या अवस्थेत पाण्यात उभी असल्याने मोठे नुकसान होणार आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

क्षेत्रफळाचा विस्तार तब्बल १४७ एकराचा
तालुक्यात आतापर्यंत १९९६ मध्ये आजचे ८९६ मिमी, १९९९ मध्ये ६७१ तर २००६ मध्ये ९१३ मिमी व गेल्या वर्षी परतीच्या पावसाच्या कृपेमुळे ६९६ मिलिमीटर पाऊस पडला होता. पावसाने तालुक्यात सर्व छोटे-मोठे बंधारे भरले. पण सर्वांत मोठा असलेला डोंगरगावचा पाझर तलाव २००२, २००६ व २०१२ आणि या वर्षीच भरल्याचे दिसते. १९७२ च्या दुष्काळात साकारलेल्या या बंधाऱ्याची लांबी ९९९ मीटर, तर रुंदी ४७८ मीटर असून, क्षेत्रफळाचा विस्तार तब्बल १४७ एकराचा आहे. 

पाऊस पोचला १४८ टक्क्यांवर 
तालुक्याची वार्षिक सरासरी ४५३ मिलिमीटर असून, आजपर्यंत ६७४ मिलिमीटर (तब्बल १४८ टक्के) पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १३१ मिमी असताना आजपर्यंत तब्बल २२९ मिमी पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने मोठे नुकसान होत असताना दुसरीकडे रब्बीचा आशावादही जागा झाला आहे. 
हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

अतिवृष्टीमुळे पिके अक्षरशः पाण्यात गेली आहेत. उन्हाळ कांदारोपे आणि लाल कांद्याची लागवडही पाण्यामुळे वाया गेली आहे. रब्बीची पिके चांगली येतील; पण फायदा कमी आणि नुकसान मोठे म्हणून ‘थोडी खुशी थोडा गम’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. - भागवत सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला 

पुणेगाव, दरसवाडी व नंतरच्या मांजरपाड्याचे पाणी पोचले, तरच हा बंधारा दर वर्षी भरू शकणार असून, त्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. यंदा तलाव अपेक्षेपेक्षा लवकर ओव्हरफ्लो झाल्याने समाधान आहे. मात्र अधिक पाऊस नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. - राऊसाहेब मोहन, डोंगरगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dongargaon lake overflows after eight years nashik marathi news