दुष्काळी तालुक्यांची यंदा पावसाने केली हौस; अपवाद वगळता सरासरी पाऊस

संतोष विंचू
Friday, 2 October 2020

यंदा मात्र सर्व काही विपरीत झाले असून, थेंबभर पाण्यासाठी आसुसलेल्या दुष्काळी तालुक्यांना वरुणराजाने अक्षरशः धुवून काढले. खरिपाच्या पिकांची काढणी सुरू असताना मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी जमिनीही उफळल्याने आता तरी पावसाने उघडीप द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 

नाशिक : (येवला) कांदे वाक्यातच मरताय, कपाशीचे बोंडे सोडू लागली, मका आडवी झाली, टोमॅटोवरही रोग पडला तर कांदारोपांची माती झाली, अशी सर्वच पिकांची धो-धो पडणाऱ्या पावसाने वाट लावल्याने आता जिल्ह्यातील दुष्काळी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे सर्व दुष्काळी तालुक्यांनी यंदा सरासरी पार केली असून, दीडशे टक्क्यावर आकडा पोचला आहे, तर पावसाचे माहेरघर असलेले तालुके सरासरी पार करण्यासाठी झगडताना दिसताय. 

तालुक्यांना वरुणराजाने अक्षरशः धुवून काढले

पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, दिंडोरी आणि नाशिक भागात पडणारा पाऊस, गोदावरीला येणारा पूर, त्यातून अर्धा जिल्ह्यात होणारी जलमय परिस्थिती... तर इकडे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सिन्नर आदी तालुक्यांची मात्र पावसाची चातकासारखी प्रतीक्षा असे वर्षानुवर्षे ठरलेले चित्र... यंदा मात्र सर्व काही विपरीत झाले असून, थेंबभर पाण्यासाठी आसुसलेल्या दुष्काळी तालुक्यांना वरुणराजाने अक्षरशः धुवून काढले. खरिपाच्या पिकांची काढणी सुरू असताना मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी जमिनीही उफळल्याने आता तरी पावसाने उघडीप द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 

सप्टेबरमध्ये ११२ टक्के 

सप्टेंबरमध्ये जिल्ह्याची पावसाची सरासरी १८३ मिमी असताना महिनाभरात २१५ मिमी मीटर म्हणजे ११२ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली असून, जिल्ह्यात ११२ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे दुष्काळी असलेल्या मालेगावमध्ये तब्बल १७५, तर नांदगावमध्ये १५६ टक्के पाऊस नोंदवला गेला असून, हा विक्रमच आहे. 

दिवसात बदलले आकडे 

गेले चार महिने जिल्हाधिकारी कार्यालयाने पर्जन्याच्या अहवालात जून ते सप्टेंबर या कालावधीतील पाऊस गृहीत धरून वार्षिक सरासरी पर्जन्यमान काढले होते. यामुळे तालुक्याची पावसाची टक्केवारी जास्त दिसत होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जून ते ऑक्‍टोबरची वार्षिक सरासरी ठरवल्याने गुरुवारी (ता.१) अचानक आकडे बदलले आहेत. त्यामुळे तालुकानिहाय वार्षिक पर्जन्यमानाची टक्केवारी देखील कमी झाली असून, बुधवारी (ता.३१) पर्यंत टक्केवारीची शंभरी ओलांडलेल्या दिंडोरी, कळवणचे टक्के आज कमी झाले तर २०० च्या उंबरठ्यावर असलेल्या मालेगावची टक्केवारी पावणे दोनच्यावर आली. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

पाऊस बोलतो...(आकडे ता.१ पर्यतचे (मिमीमध्ये) 
तालुका - वार्षिक पर्जन्यमान आतापर्यंत पाऊस वार्षिक टक्केवारी 

नाशिक - ७५७ ७३२ ९६.७८ 
इगतपुरी - ३१३८ ३७५९ १२० 
दिंडोरी - ७३७ ७०८ ९६ 
पेठ - २१०५ १५७४ ७४.७७ 
त्र्यंबकेश्वर - २२२७ १३६४ ६१ 
मालेगाव - ५०६ ८८६ १७५ 
नांदगाव - ५४८ ८२८ १५१ 
चांदवड - ५७८ ७२८ १२६ 
कळवण - ७०० ६६५ ९५ 
बागलाण - ५५३ ८५९ १५६ 
सुरगाणा - १९६६ १४४७ ७३.५९ 
देवळा - ४८९ ६४४ १३२ 
निफाड - ५१८ ६०६ ११७ 
सिन्नर - ५९० ८१२ १३८ 
येवला - ५१२ ६७३ १३१ 
जिल्हा सरासरी १०६१ १०८५ १०२

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought talukas received average rainfall this year nashik marathi news