केबीसीसह सिन्नर पतसंस्थेची ईडीकडून तपासणी; तपास पथकाचा २ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ

अजित देसाई 
Thursday, 26 November 2020

केबीसीत असंख्य गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले असून संस्थेचा मुख्य संचालक गजाआड आहे. तर सिन्नर येथील सिन्नर नागरी पतसंस्थेत देखील आर्थिक अनियमिततेमुळे ठेवीदार अडचणीत आले आहेत.

सिन्नर (नाशिक) : आर्थिक अनियमितता व ठेवीदारांच्या हितरक्षणास बाधा पोहोचवल्या प्रकरणी केबीसीसह सिन्नर व नाशिक येथील सिन्नर नागरी पतसंस्थेच्या शाखांमध्ये व्यवहारांची तपासणी करण्यासाठी केंद्रीय तपास पथक गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. या पथकाने संबंधित संस्थाविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती घेत प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांची तपासणी केल्याचे वृत्त आहे.

अपहार करून मिळवलेली रक्कमेचा शोध

केबीसीत असंख्य गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले असून संस्थेचा मुख्य संचालक गजाआड आहे. तर सिन्नर येथील सिन्नर नागरी पतसंस्थेत देखील आर्थिक अनियमिततेमुळे ठेवीदार अडचणीत आले आहेत. या संस्थेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली असून गेल्या काळातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही संस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या हितरक्षणास बाधा पोहचवली असून अपहार करून मिळवलेली रक्कम कुठे गुंतवली याचा शोध घेण्यासाठी केंद्राचे तपास पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. ईडीच्या पथकामार्फत ही चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात असून मनी लॉंन्ड्रीगच्या संदर्भात माहिती संकलित करण्यात येत आहे.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

कारवाई बाबत कमालीची गुप्तता

आज (दि.26) सिन्नर नागरी पतसंस्थेच्या जिल्हा परिषदे समोरील शाखेत तपास पथकातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. संस्थेचे कर्जदार आणि ठेवीदारांची नाव व पत्त्यासह यादी पथकाने ताब्यात घेल्याचे समजते. तर केबीसी संदर्भात देखील आडगाव येथे चौकशी करण्यात आली असून सदर संस्थांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईची सद्यस्थिती देखील पोलिस यंत्रणेकडूनजाणून घेण्यात आली. असे असले तरी एकूणच या कारवाई बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. पतसंस्थेच्या सिन्नर येथील कार्यालयात देखील तपासणी करण्यात आल्याची चर्चा असून त्याबाबत देखील अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED inquires into the transactions of KBC Sinnar Patsanstha nashik marathi news