निफाड तालुक्यात ६५ ग्रामपंचायतींसाठी धुमशान; स्थानिक नेत्यांची मोर्चेबांधणीला सुरवात

gram panchayat election
gram panchayat election

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : गावपातळीवर महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तेचे सिंहासन आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केल्याने निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे धुमशान रंगत आहे. नववर्षात सत्तेच्या सिंहासनाचा बंपर धमाका कोणाला लाभ देईल, याकडे लक्ष वेधले आहे.

कोरोनामुळे स्थगित ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाल्याने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत, तर सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर असल्याने स्थानिक मातब्बरांचा काहीसा हिरमोड होऊन बुचकळ्यात पडले आहेत. 
बहुप्रतीक्षेतील निवडणूक जाहीर झाल्याने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. गावाकडे कधीच न फिरणारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावविकासाच्या गप्पा मारू लागल्याचे चित्र आहे. निवडणुकीनिमित्त सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडतो आहे. निवडणुकीसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. 

तालुक्यात महाविकास आघाडी अशक्यच 

महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका एकत्र लढण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले. पण निफाड तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर व शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यांच्या राजकीय हाडवैराचा पाझर गावागावातील त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत पोचला आहे. निफाड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या धुरळ्यात त्यामुळे पॅनलनिर्मितीत महाविकास आघाडी मुश्‍कील ही नहीं, नामुमकिन है...अशी स्थिती आहे. तसे पाहिले तर ग्रामपंचायत निवडणुकांना पक्षीय रंग नसतो. पण महाविकास आघाडीचा वारू राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत जोरदार उधळल्याने हाच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा मानस मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवल्याने ग्रामपंचायत निवडणुकांना पक्षीय रंग येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांचे निफाड मतदारसंघात वर्चस्व आहे. भाजप, कॉँग्रेस व मनसेचा जीव तोळामासा आहे. बनकर-कदम या आजी-माजी आमदारांमधील राजकीय संघर्ष पाहता महाविकास आघाडी अशक्य आहे. ग्रामपंचायत सदस्यांतून जिल्हा परिषद, आमदारपदाला गवसणी घालता येते हे आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या राजकीय वाटचालीतून दिसते. तसेच मनसुबे घेऊन काही इच्छुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून राजकीय श्रीगणेशा करण्याच्या विचारात आहेत. 

निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती 

रौळस, आहेरगाव, बेहेड, भुसे, चाटोरी, दारणासांगवी, गोंडेगाव, काथरगाव, खेडे, कोठुरे, म्हाळसाकोरे, नैताळे, रानवड, रसलपूर, शिरसगाव, शिरवाडे, वणी, सोनेवाडी, सुंदरपूर, दात्याणे, दावचवाडी, कारसूळ, महाजनपूर, मुखेड, खेरवाडी, पिंपरी, रामनगर, सावरगाव, शिवडी, सोनगाव, वावी, उंबरखेड, वडाळी नजीक, रेडगाव, अंतरवेली, चापडगाव, करंजगाव, करंजी, नांदूर, पिंपळगाव निपाणी, सायखेडा, भेंडाळी, उगाव, औरंगपूर, ओणे. 


निफाड मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा सिद्ध होईल. पक्षश्रेष्ठींनी अद्याप महाविकास आघाडीबाबत आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे पूर्ण ताकदीशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणूक लढतील. 
-राजेंद्र डोखळे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी, निफाड 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने शिवसैनिक सहा महिन्यांपासून कामाला लागले आहेत. माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तरीही महाविकासाचा फॉर्म्युला राबविण्यातबाबत पक्षप्रमुखांचा जो आदेश येईल, त्या पद्धतीने वाटचाल केली जाईल. 
-सुधीर कराड, तालुकाप्रमुख, शिवसेना, निफाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com