प्लाझ्मा थेरपीचे वरदान! अत्यवस्थ रुग्णांना मिळालं जीवदान

Plasma_therapy.jpg
Plasma_therapy.jpg

नाशिक : मृत्युदर रोखण्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग नसल्याचे दिसून आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे; पण त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोना थेरपी सुरू ठेवण्याचे धोरणही स्वीकारले गेले. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरु असताना प्लाझ्मा थेरपीची नेमकी स्थिती काय? याचा धांडोळा घेतल्यावर अत्यवस्थ रुग्णांना प्लाझ्माने जीवदान मिळाल्याची उदाहरणे पुढे आली आहेत.

अत्यवस्थ रुग्णांना मिळालं जीवदान! 

राज्य सरकारने प्लाझ्मा थेरपीविषयीची भूमिका स्वीकारल्यापासून गेल्या आठवड्यापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांनी नाशिक विभागात एक हजार ८७३ प्लाझ्मा दान केले. त्यापैकी एक हजार ८४८ प्लाझ्मा रुग्णांना देण्यात आले असून, २५ प्लाझ्मा शिल्लक आहेत. ‘सकाळ’ला मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची चाचणी केल्यावर ‘सीटी सिव्हिरीटी स्कोर’ २५ पैकी २५ होता. त्यांच्यावर व्हेंटिलेटरचे उपचार सुरू होते. फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणापर्यंत वैद्यकीय इलाजाबद्दल विचारविनियम चालला होता. त्यांच्यासाठी नाशिकमधील रक्तपेढीतून तीन प्लाझ्मा देण्यात आले.

नाशिक विभागात दात्यांकडून एक हजार ८७३ प्लाझ्मांचे दान 

प्लाझ्मा थेरपीनंतर ते अधिकारी घरी आले आणि सद्यःस्थितीत त्यांनी कार्यालयीन कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे, तर रक्तपेढीमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनाचे इंजेक्शन त्यांना देण्यात आले. उपचारानंतर ते घरी आले. मात्र काही दिवसांनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले. त्या वेळी त्यांना दोन प्लाझ्मा देण्यात आले. याही डॉक्टरांची प्रकृती सुधारली आहे. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

प्लाझ्मा दानची चळवळ 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना विषाणू संसर्ग पूर्वी राज्यात टिपेला पोचला असताना नाशिकच्या दौऱ्यावर असताना प्लाझ्मा थेरपीबद्दलचे सुतोवाच केले होते. त्यानंतर त्यांनी प्लाझ्मा दानाची चळवळ उभारण्याविषयीची भूमिका मांडली होती. एवढेच नव्हे, तर वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी केंद्र सुरू करण्यात आले. प्लाझ्मा दान आणि रुग्णांना देण्यात आलेल्या प्लाझ्माची माहिती रक्तपेढ्यांकडून अन्न-औषध प्रशासन विभागाला कळविण्यात येते. अन्न व औषध प्रशासनच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी नाशिक विभागातील गेल्या आठवड्यापर्यंत झालेल्या प्लाझ्मा दान आणि रुग्णांना देण्यात आलेल्या प्लाझ्माची माहिती दिली. नाशिक विभागात नऊ ठिकाणी प्लाझ्मा संकलनाची व्यवस्था आहे. 

नाशिक विभागातील प्लाझ्माची स्थिती 
रक्तपेढी प्लाझ्मा दानची संख्या रुग्णांना दिलेल्या प्लाझ्मांची संख्या 
इंडियन रेडक्रॉस सोसायटी (जळगाव) ५० ३४ 
अर्पण (नाशिक) १ हजार ३९४ १ हजार ३९४ 
नवजीवन (नाशिक) ११ ११ 
सद्गुरू कृपा (नाशिक) २४० २४० 
सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (धुळे) १६ ११ 
सरकारी रुग्णालय (नगर) ४ २ 
जनकल्याण (नाशिक) १५४ १५३ 
जनकल्याण (नगर) ४ ३ 

कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्माचा फायदा झाला आहे. सद्यःस्थितीत लस उपलब्ध नसल्याने प्लाझ्मा हा प्राथमिक आधार वाटत आहे. एवढेच नव्हे, तर जागतिक स्तरावर आहार-विहाराव्यतिरिक्त प्लाझ्मा मोठा आधार झाला आहे. त्याबद्दलची जनजागृती होणे आवश्‍यक आहे. - डॉ. विक्रांत जाधव (नाशिक) 

प्लाझ्मा कोणत्या कोरोनाग्रस्त रुग्णाला द्यायचा हा डॉक्टरांचा निर्णय असतो. प्लाझ्मा थेरपीबद्दल जगभर संशोधन सुरू आहे. मात्र, आताची परिस्थिती पाहता कोरोनामुक्त दात्यांनी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यायचे आहे. रक्तदानासारखी ही प्रक्रिया असल्याने दात्याला त्रास होत नाही. -डॉ. राजेंद्र थिगळे, पॅथॉलॉजिस्ट 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने प्लाझ्माबद्दलची नियमावली ठरवून दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर उपचारातून बरे झाल्यावर पुढील २८ दिवसांनी कोरोनामुक्त झालेले प्लाझ्मा दान करू शकतात. पंधरा दिवसांच्या अंतराने प्लाझ्मा दान करता येतो. नाशिकमध्ये चार ते पाचवेळा एका दात्याने प्लाझ्मा दान केल्याची उदाहरणे आहेत. - डॉ. नंदकिशोर ताथेड, अर्पण रक्तपेढी, नाशिक 
--- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com