
दुचाकीचोरीला आळा घालण्यासाठी विनाक्रमांकाचे वाहन व वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम सुरू केली पाहिजे, अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत. दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मालेगाव (नाशिक) : शहर व परिसरातून दुचाकीचोरीचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो (एमएच ०४, एफजे ६५२१) चोरीला गेला. सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकींचीही चोरी झाल्याने पावणेदोन लाखांची तीन वाहने चोरीला गेली. दुचाकीचोरीला आळा घालण्यासाठी विनाक्रमांकाचे वाहन व वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम सुरू केली पाहिजे, अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत. दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल
शहरातील फरहान हॉस्पिटलसमोरील मयूर ऑटो कन्सल्टंट दुकानासमोर अमजद युसूफ मिया (वय २९, रा. नागछाप झोपडपट्टी) या हमाल कामगाराचा छोटा हत्ती टेम्पो उभा असताना चोरट्यांनी लंपास केला. अमजद युसूफ यांच्या तक्रारीवरीन पवारवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरा प्रकार महेशनगर भागात घडला. रशीद शेख चांद (३९, रा. महेशनगर मंदिराजवळ) यांच्या मालकीची सुमारे २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची, लाल पट्टा असलेली होन्डा शाइन दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. शहर पोलिस ठाण्यात अमजद युसूफ मियाँ यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं
न्यायालय आवाराच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी
येथील कॅम्प रस्त्यावरील सत्र न्यायालयाच्या पार्किंगमधून खलील अहमद अब्दुल अजीज (वय ४८, रा. आझाद चौक) यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर दुचाकी (एमएच ४१, एडी ८७२८) चोरट्यांनी लंपास केली. मंगळवारी हा प्रकार घडला. शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने खलील अहमद यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ