Onion Export Ban : अन् मुंडन करुन घेत त्यांनी चक्क घातले 'सरकारचे श्राध्द'...पाहा VIDEO

संतोष विंचू
Thursday, 17 September 2020

या सुलतानी निर्णयाविरुद्ध राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांची प्रहार संघटना राज्यभर आक्रमक झाली असून आज तालुका प्रहार संघटनेच्या वतीने एरंडगाव येथे केंद्र शासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन करून पिंडदान करत सरकारचे श्राद्ध घालण्यात आले.

नाशिक/येवला : (एरंडगाव) केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना काही मंत्र्यांच्या शिफारसीवरून कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन आधीच मरणासन्न शेतकऱ्यांचा गळाच दाबलेला आहे. एरंडगाव येथे गुरुवारी (ता. 17) कांदा निर्यातबंदी विरोधात प्रहारने मुंडन करून आंदोलन केले. तसेच शेतकऱ्यांनी पिंडदान करून सरकारचे श्राद्ध घालत निषेध केला.

मुंडन आंदोलन करून पिंडदान करत सरकारचे श्राद्ध

केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेव दानवे हे नेहमी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा डांगोरा पिटत असतांना त्यांनीच राज्यातील कांदा उत्पादकांच्या थेट पोटावरच वार करून आम्हा शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहोत, याचा पुरावाच निर्यात बंदी करून दिलाय. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पोटच्या पोरासारखा सांभाळलेल्या शाळेतील कांद्याला मातीमोल भाव मिळणार आहे. या सुलतानी निर्णया विरुद्ध राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांची प्रहार संघटना राज्यभर आक्रमक झाली असून आज तालुका प्रहार संघटनेच्या वतीने एरंडगाव येथे केंद्र शासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन करून पिंडदान करत सरकारचे श्राद्ध घालण्यात आले.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

यावेळी तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, संघटक किरण चरमळ, शंकर गायके, वसंत झांबरे, पांडुरंग शेलार, जगदीश गायकवाड, रामभाऊ नाईकवाडे, गणेश लोहकरे, सचिन पवार, शिवाजी निकम, भागवत भड, सागर गायकवाड, कलीम पटेल, गोरख निर्मळ, संजय मेंगाने, माहेबूब शेख, दत्तू बोरणारे, बाळू बोराडे, संतोष रंधे, निवृत्ती मढवई, वाल्मिक घोरपडे, शिवाजी खापरे, बाळासाहेब गुंजाळ, रशीद पटेल, सुदाम पडवळ, अशोक खापरे, दत्तू घोरपडे, काका पडवळ यांचेसह गाव व तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

महाराष्ट्राच्या दुर्दैवाने केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे राज्यातीलच असून त्यांच्याच शिफारशीवरून लादण्यात आलेली निर्यातबंदी म्हणजे 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' अशी अवस्था झालीय. यानंतर शासनाने हा अन्यायकारक निर्णय मागे न घेतल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता आंदोलन उग्र करण्यात येईल. तसेच लवकरच गनिमी काव्याने दिल्लीत आंदोलन करण्यात येईल. - हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष,प्रहार शेतकरी संघटना, येवला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Erandgaon, farmers paid obeisance to the government by donating Pind nashik marathi news