परंपरा आषाढाची...सर्व मंदिरे बंद तरीही 'इथं' होतोय ग्रामदैवताचा जागर!

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 13 July 2020

गावागावांतील सुवासिनींनी सुरक्षित अंतर राखत आया माउलींची पूजा केली. ग्रामदैवताचा जागर करत शहराच्या अनेक भागातही आषाढ महिन्यातील मंगळवार व शुक्रवारी आया माउलींची श्रद्धेने पूजा केली जात आहे. 

नाशिक : (मालेगाव कॅम्प) कोरोनाने शेकडो वर्षांच्या व कधीही खंडित न होणाऱ्या परंपरांना छेद दिला. सर्व धर्मियांच्या धार्मिक रुढी व परंपरा मोडीत काढल्या असतानाच ग्रामीण भागात आषाढ महिन्यात ग्रामदैवत पूजन करून "तळणाचा' नैवेद्य दाखवण्याची परंपरा व श्रद्धेपुढे कोरोना फिका पडला.

आषाढ नैवेद्याची परंपरा

वर्षभरात आषाढात रोगराई नष्ट व्हावी, कुठल्याही प्रकारचे आरिष्ट्य येऊ नये अशा श्रद्धात्मक भावनेने दही-भात, कुरडई, गोड पुरी असा नैवेद्य केला जातो. अनेक गावाच्या शिवारात असलेल्या ग्रामदैवताचा भंडारा करण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने सामिष भंडारा अनेक ठिकाणी होतो. घरोघरी सामिष व गोड जेवण बनविण्यात येते. आषाढ-श्रावणात शास्त्रीयदृष्ट्या दमट वातावरणात पचनक्रिया मंदावते. आहाराच्या बाबतीत काळजी घेतली जाते. गाव, खेड्यात घरोघरी याला महत्त्व दिले जाते. शहरातील महिलांनीही शतपावली करत आया माउलींच्या आषाढ नैवेद्याची परंपरा जोपासली. 

सुरक्षित अंतर राखत पूजा 

आषाढातील मंगळवार व शुक्रवारी आया माउलींच्या मंदिरात इनरव्हील क्‍लबकडून जनजागृती करण्यात आली. नैवेद्य दाखवताना महिला पाणी फिरवतात. त्यामुळे नैवेद्य ओला होतो. नैवेद्य हा प्रतीकात्मक असतो. आजही अनेकांच्या भुकेचा प्रश्‍न असताना हा नैवेद्य पुजाऱ्याने संकलन करावा. त्या परिसरातील गोरगरीब, भिकारी यांना द्यावा, असे नियोजन इनरव्हीलने केले. या प्रकल्पासाठी अध्यक्ष नीलिमा खरे, सचिव ऍड. सुचेता सोनवणे, जयश्री सूर्यवंशी, स्नेहल विसपुते, अरुणा पाटील यांनी पुढाकार घेतला. 

हेही वाचा > आश्चर्यच! लग्नानंतर दहा वर्षांनी दाम्पत्याला लागली लॉटरी...एक सोडून तिघांची एंन्ट्री!

परंपरा एकदम खंडित होत नसतात. महिलांची जागृती करणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमातून दोन घास भुकेल्यांच्या पोटात जाईल. अन्नाचा सदुपयोग होईल. अशा परंपरेतून सामाजिक दायित्व जपण्याची सध्याच्या कठीण परिस्थितीत गरज आहे. - सुचेता सोनवणे, सचिव- इनरव्हील क्‍लब, मालेगाव  

हेही वाचा > भरदुपारी चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even though all the temples are closed, the village deity is being worshiped 'here' nashik marathi news