शासनाची 'माजी सैनिक मालमत्ता करसवलत योजना' कागदावरच; अद्याप एकही अर्ज नाही

विक्रांत मते
Tuesday, 22 September 2020

संरक्षण दलातील शौर्यपदकधारक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तांवर शासनाने कर सवलत देण्याचा निर्णय घेतला. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अमलात आलेल्या योजनेची महापालिकेमध्ये अंमलबजावणी सुरू झाली पण..

नाशिक : माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करात सवलत देण्यासाठी राज्य शासनाच्या कै. बाळासाहेब ठाकरे कर सवलत योजनेअंतर्गत महापालिकेकडे अद्यापही एकही अर्ज प्राप्त झाला नाही. योजनेसंदर्भात माजी सैनिकांना माहितीच नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने आता योजना अमलात आणली असली तरी महापालिकेत दोन वर्षांपासून माजी सैनिकांना करात सवलत दिली जात असून, त्याचा लाभ १७५ माजी सैनिक घेत आहेत. 

नाशिकमध्ये योजना कागदावरच

संरक्षण दलातील शौर्यपदकधारक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तांवर शासनाने कर सवलत देण्याचा निर्णय घेतला. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अमलात आलेल्या योजनेची महापालिकेमध्ये अंमलबजावणी सुरू झाली असली तरी अद्यापपर्यंत महापालिकेला एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नाशिकमध्ये योजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने जिल्हा सैनिकी कल्याण व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रितसर अर्ज करून माजी सैनिकांची यादी पाठविण्याचे आवाहन केले. परंतु दोन्ही कार्यालयांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ज्या माजी सैनिकांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांना कराचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा > अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

महापालिकेची योजना तीन वर्षांपासून 

शासनाने शौर्यपदकधारक किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर मालमत्ता असेल तर, मालमत्ता करातून सवलत देण्याचे आदेशित केले. नाशिक महापालिकेने त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत यापूर्वीच म्हणजे तीन वर्षांपासून मालमत्ता करात सवलत देण्याचे धोरण अवलंबिले आहे. विशेष म्हणजे कुठलीही अट न ठेवता माजी सैनिक असलेल्याला कर सवलत योजना लागू केली असून, त्याचा लाभ आतापर्यंत १७५ माजी सैनिकांनी घेतला आहे. 

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

 संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-servicemen property tax relief scheme nashik marathi news