कोरोनामुक्त शहर करण्यासाठी अधिकारांचा पुरेपुर वापर करा - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने अधिकाराचा पुरेपूर वापर करावा. भविष्यातील धोके ओळखून सोपविलेल्या जबाबदारीचे काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. 21) येथे दिल्या. सोशल डिस्टन्सिंगसाठी येथील विश्रामगृहाच्या आवारातील मोकळ्या जागेत सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. 
 

नाशिक : (मालेगाव) शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने अधिकाराचा पुरेपूर वापर करावा. भविष्यातील धोके ओळखून सोपविलेल्या जबाबदारीचे काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. 21) येथे दिल्या. सोशल डिस्टन्सिंगसाठी येथील विश्रामगृहाच्या आवारातील मोकळ्या जागेत सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. 

रमजान पर्वाच्या अनुषंगाने सोयीसुविधांबाबतही सूक्ष्म आराखड्याचे आदेश

श्री. मांढरे म्हणाले, की सामान्य रुग्णालय हे यापुढे नॉनकोविड असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेताना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लगतच्या पाचही तालुक्‍यांतील शासकीय वाहनांसह कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ अधिग्रहित करावी. रुग्ण दाखल होण्यापूर्वीच त्याचे सीडीआरसह कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व्हावे. मनपा समितीला सहकार्य करावे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पाचही तालुक्‍यांतील कर्मचाऱ्यांच्या टीम मालेगाव तालुक्‍यातील सर्व चेकपोस्टवर नियुक्त कराव्यात. क्वारंटाइन रुग्णांचे वर्गीकरण, मोबाईल शौचालय, बॅरिकेड्‌स, नव्याने दाखल रुग्णांसाठी क्वारंटाइनची सुविधा, निर्जंतुकीकरण, फवारणी, साईनेजेस, अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा याबाबत त्यांनी सूचना दिल्या. रमजान पर्वाच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांसाठी आवश्‍यक सोयीसुविधांबाबतही सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. 

हेही वाचा > अखंडित वीजपुरवठ्यासाठी राबताय शेकडो हात!...'वर्क फ्रॉम होम'साठी त्यांचाही हातभार

आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी

कोविड केअर सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांनाही चांगल्या सुविधा देणे, अधिग्रहित केलेल्या खासगी आरोग्यसेवा नाकारणाऱ्यांचे समुपदेशन करावे. या राष्ट्रीय आपत्तीत शासकीय सामग्रीसह सर्व खासगी संस्था, खासगी डॉक्‍टर्सची आवश्‍यक्ता आहे. येथील प्रतिसाद वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, प्रातांधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे, डॉ. गोविंद चौधरी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 

हेही वाचा > चक्क थेट संपर्क टाळण्यासाठी 'कि-चेन'?...'या' विद्यार्थ्यांची आयडियाची कल्पना तर जाम भारी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exercise your powers to make the city a corona free - collector nashik marathi news