
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १६) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अवर सचिव अजय चौधरी यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
फडणवीस यांचे आश्वासन
दिघोळे म्हणाले, की १४ सप्टेंबर २०२० ला कांद्याची निर्यातबंदी केली. त्या वेळेस कांद्याचा तुटवडा होता, असे केंद्र सरकारचे म्हणणे होते. त्यामध्ये काहीअंशी तथ्य असले, तरी आता मात्र राज्यामध्ये मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध झाला आहे. तसेच कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाल्याने व कांद्यासाठी पोषक हवामान असल्याने आगामी काळात अधिक कांदा उत्पादन होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कसल्याही प्रकारची दिरंगाई न करता निर्यातबंदी उठवावी. या भेटीवेळी फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तत्काळ कांदा निर्यातबंदी उठवली जाईल, असे आश्वस्त केले.
महाविकास आघाडी सरकारचे आमदार आणि मंत्री यांचीही शिष्टमंडळाने भेट घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय भदाणे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार, मालेगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, कोपरगाव तालुकाध्यक्ष वसंत देशमुख, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेखर कापडणीस, जिल्हा समन्वयक भगवान जाधव, सुनील ठोक, किरण सोनवणे, समाधान गुंजाळ, दिगंबर धोंडगे, नयन बच्छाव, हर्षल अहिरे, भाऊसाहेब शिंदे, कैलास जाधव, सुरेश ठोक, आबा आहेर, ज्ञानेश्वर ठोक, गंगाधर मोरे आदी कांदा उत्पादकांचा समावेश होता.
भेटीसाठी निवासस्थानापुढे ठिय्या
फडणवीस यांची भेट मिळावी म्हणून कांदा उत्पादकांनी आक्रमक भूमिका घेतली. श्री. फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडण्यात आला. त्यानंतर श्री. फडणवीस यांनी भेटीसाठी बोलविल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. एकूणच परिस्थिती पाहता, ऐन थंडीमध्ये कांद्याच्या कोसळणाऱ्या भावाचा मुद्दा तापणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.