जात पडताळणी प्रमाणपत्र सादरीकरणासाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलचा निर्णय

admission.jpg
admission.jpg

नाशिक : प्रथम वर्ष पदवी, पदव्‍युत्तर पदवी, विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक प्रमाणपत्र संबंधित यंत्रणांकडून वेळीच उपलब्‍ध होत नसल्‍याच्‍या पालक- विद्यार्थ्यांच्‍या राज्‍यभर तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रमाणपत्र सादरीकरणासाठी बुधवार (ता. २०) पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. या मुदतीपर्यंत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दुसऱ्या फेरीत खुल्‍या प्रवर्गातून ग्राह्य धरला जाईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

अन्‍यथा खुल्‍या प्रवर्गातून प्रवेश ग्राह्य धरणार

सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रवेश घेणाऱ्या तंत्रशिक्षणाअंतर्गत विविध पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या उमेदवारांसाठी व अर्ज स्‍वीकृती केंद्र आणि सर्व संस्‍थांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या परिपत्रकात म्‍हटले आहे, की उमेदवार व पालक यांच्‍या लेखी व तोंडी निवेदनानुसार इडब्‍ल्‍यूएस मूळ प्रमाणपत्र, एनसीएल मूळ प्रमाणपत्र व मूळ जातपडताळणी प्रमाणपत्र (सीव्‍हीसी) सादर करण्यासाठी बुधवार (ता. २०)पर्यंत मुदतवाढ दिली जाते आहे. या वाढीव कालावधीत पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या सर्व विद्यार्थ्यांनी स्‍वतःच्‍या लॉगीनमधून ऑनलाइन पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करावे. 

संकेतस्‍थळावर जाहीर 

बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत मूळ प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करून त्‍यांना दुसऱ्या फेरीकरिता खुल्‍या प्रवर्गातून पात्र ठरविण्यात येईल. या तिन्‍ही प्रमाणपत्रांकरिता अर्ज केल्‍याची पावती ऑनलाइन अर्ज करताना सादर केलेल्‍या विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ दिली जात आहे. तसेच पुढील सुधारित वेळापत्रक सोमवारी (ता. १८) राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्‍या संकेतस्‍थळावर जाहीर केले जाईल, असे स्‍पष्ट केले आहे. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे पाठपुरावा 

गेल्या दोन दिवसांपासून या प्रमाणपत्रांच्‍या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्‍या हितासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्‍या माध्यमातून संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू होता. संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत प्रदेशाध्यक्ष सुनील गव्‍हाणे, सुहास उभे यांच्‍यासह विश्र्वजित कदम यांच्‍या मार्गदर्शनाखाली केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश आले असल्‍याचे ॲड. अजिंक्‍य गिते यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे. आकाश छाजेड यांनीदेखील यासंदर्भात श्री. कदम यांच्‍याशी फोनद्वारे संपर्क साधत मुदतवाढीसाठी पाठपुरावा केला होता, असे पत्रकात म्‍हटले आहे. ॲड. अजिंक्य गिते, विद्यासागर घुगे, महेश गायकवाड, शरद ताठे, प्रवीण दातीर, प्रतीक महाजन आदींनी यासंदर्भात पाठपुरावा केला.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com