पाच महिन्यांनंतरही तीन कुटुंबे विस्थापितच;भीमवाडी आग दुर्घटनेतील कुटुंबाची विदारक स्थिती 

युनूस शेख
Friday, 25 September 2020

भीमवाडी आगपीडित घटनेतील तीन कुटुंबांचे पाच महिन्यांनंतरही पुनर्वसन झालेले नसल्याने ही कुटुंबे आजही शाळेत वास्तव्यास आहेत. आगीत सर्व काही गमावले, लॉकडाउनमुळे काम बंद असल्याने घराच्या उभारणीसाठी पैसेच नसलेल्या या कुटुंबांना शाळेच्या इमारतीच्या आश्रयाने राहावे लागत आहे. 

नाशिक : भीमवाडी आगपीडित घटनेतील तीन कुटुंबांचे पाच महिन्यांनंतरही पुनर्वसन झालेले नसल्याने ही कुटुंबे आजही बी. डी. भालेकर शाळेत वास्तव्यास आहेत. आगीत सर्व काही गमावले, लॉकडाउनमुळे काम बंद असल्याने घराच्या उभारणीसाठी पैसेच नसलेल्या या कुटुंबांना शाळेच्या इमारतीच्या आश्रयाने राहावे लागत आहे. 

पाच महिन्यांनंतरही तीन कुटुंबे विस्थापितच 

भीमवाडी वसाहतीत २५ एप्रिलला लागलेल्या आगीत १२५ घरे पूर्णपणे जळून खाक झाली. पीडित कुटुंबीयांचे सर्व काही होत्याचे नव्हते झाले. जळालेल्या घरांच्या अवशेषाशिवाय महापालिकेकडून पीडिताची व्यवस्था जीपीओ रोडवरील महापालिकेच्या बी. डी. भालेकर शाळेत करण्यात आली. महापालिकेसह सामाजिक संस्थांनी त्यांच्या भोजनांची व्यवस्था केली. मात्र हळूहळू त्यातील काही कुटुंबांनी त्यांच्याकडे असलेली थोडीफार रक्कम आणि शासनाकडून मिळालेली २० हजारांच्या मदतीतून त्यांची घरे उभारली. मात्र आर्थिक स्थिती अतिशय बिकट असलेल्या तीन कुटुंबांचे अजूनही शाळेतच बस्तान आहे. आगीनंतर देशात लॉकडाउनमुळे शहरातील उद्योगधंदे, व्यवसाय बंद होते. नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध होता. नागरिकांना दैनंदिन खर्च भागविणे अवघड असलेल्या पीडितांना नवीन संसार उभारणे शक्य नव्हते. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

भीमवाडी आग दुर्घटनेतील कुटुंबाची स्थिती 
ज्यांची आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात बरी होती त्यांनी घरकुले उभारली. टप्प्याटप्प्याने काम करून बहुतांशी पीडित कुटुंबीय पुन्हा त्यांच्या स्वतःच्या घरात वास्तव्यास गेले; परंतु त्यातील तीन कुटुंबीय असे आहेत की त्यांना ते शक्य झाले नाही. आजही ती तीन कुटुंबे बी. डी. भालेकर शाळेत वास्तव्यास आहेत. शाळेच्या व्हरांड्यात दगडाची चूल मांडून संसाराचा गाडा हाकत आहेत. हातास मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत. आगीत त्यांचे सर्व काही जळून खाक झाले आहे. लॉकडाउनमुळे कामधंदेही बंद होते. मिळालेल्या मदतीच्या रकमेपैकी काही रक्कम लॉकडाउन काळात खर्च झाल्याने शाळेत राहण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

आर्थिक परिस्थिती नसल्याने लगेचच घर बांधणे शक्य झाले नाही. हातास मिळेल ते काम करून पैसे जमा केले जात आहेत. लवकरच स्वतःच्या घरात जाऊ. -गंगूबाई घोडे (पीडित) 

 

लॉकडाउनमुळे कामधंदे बंद असल्याने घर बांधण्यासाठी पैसे जमविता आले नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून काही प्रमाणात काम सुरू झाल्याने पैशां‍ची जुळवाजुळव केली जात आहे. -मनोहर राठोड (पीडित)  

 संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family in Bhimwadi fire accident nashik marathi news