'नटखट' अदाकरीने शेवगेडांगच्या शिवांजली पोरजेचा जगभर डंका! सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांकडूनही कौतुक

ज्ञानेश्वर गुळवे
Saturday, 26 December 2020

सोशल मिडियावर सध्या एक आठ वर्षीय चिमुकलीची जोरदार चर्चा असुन तीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लाइक्स आणि फॉलोअर्स मिळत आहेत.  व्हिडिओ मधील तिच्या आकर्षक 'अल्लड़' आणि 'नटखट' अदा बघून मोठ मोठे सेलिब्रेटी देखील घायाळ झाले आहेत.

अस्वली स्टेशन (जि.नाशिक) : सोशल मिडियावर सध्या एक आठ वर्षीय चिमुकलीची जोरदार चर्चा असुन तीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लाइक्स आणि फॉलोअर्स मिळत आहेत.  व्हिडिओ मधील तिच्या आकर्षक 'अल्लड़' आणि 'नटखट' अदा बघून मोठ मोठे सेलिब्रेटी देखील घायाळ झाले आहेत. यापैकी अनेकांनी तसेच नातेवाईक व मित्रपरिवारासह मंत्री, खासदार, आमदार यांनी तिचे कौतुक केले आहे. तिच्या पालकांना लोकांनी जेव्हा फोन करून विचारपुस केली तेव्हा पालक देखील चक्रावून गेले. आपली मुलगी इतक्या कमी वयात आणि काही दिवसात सोशल मिडीयातुन जगभर इतकी फेमस होईल असे स्वप्नात देखील त्यांना वाटले नसावे.. मात्र तिच्यातील या सुप्त गुणांना आम्ही नक्कीच सपोर्ट करणार असे आत्मविश्वासाने तिचे पालक सांगत आहेत. 

३३ मिलियन व्ह्युव्हर्स मिळवत नाशिकचे नाव जगभरात पोहचवले

अवघ्या दोन तीन दिवसांत या चिमुकलीने इंस्टाग्रामवर आपले व्हिडिओ टाकुन जवळपास ३३ मिलियन विव्हर्स मिळवत नाशिकचे नाव जगभरात पोहचवले आहे.  ही चिमुकली दुसरी तीसरी कुणीही नसून ती नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील शिवांजली विष्णु पोरजे (वय ८) आहे. शिवांजली सध्या इंदिरानगर येथे आई,वडील आणि आपल्या दोन मोठ्या भावांसह राहते. शिवांजली एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. वडील विष्णु पाटील पोरजे यांची शेवगेडांग येथे शेती असुन सामाजिक राजकीय क्षेत्रात ते काम करतात. येथील आदिवासी विकास संस्थेवर ते अध्यक्ष म्हणून ही काम बघतात. लोकचळवळीत वावर असल्याने त्यांच्या सौभाग्यवती आणि शिवांजलीच्या आई ज्योती पोरजे या ग्रामपंचतीच्या उपसरपंच म्हणून जबाबदारी संभाळत आहे. मुलांच्या शिक्षणाची परवड होउ नये म्हणून  पोरजे दांपत्य काही वर्षांपासून नाशिकच्या इंदिरानगर येथे राहून घरची शेती आणि ग्रामपंचायत कामकाज बघतात. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या गावी हजर राहतात.

ऑनलाइन अभ्यास करत जोपासला छंद!

 कोरोना आणि लॉकड़ाऊन काळात शिवांजली व तिचा मोठा भाऊ प्रतीक आणि तुषार यांना आपआपले मजेशिर व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स काढण्याचा छंद लागला. कोरोना काळातील आपला ऑनलाइन अभ्यास करून त्यांनी आपला हा छंद जोपासला. मात्र हे करत असताना प्रतीक आणि तुषार यांना आपल्या छोट्या दीदीचेच फोटोज आणि व्हिडिओ काढ़णे आवडायचे. यातील शिवांजली ने काही निवडक गाण्यांचे व्हिडिओज इंस्टाग्राम, यूट्यूब सारख्या  सोशल मीडियावर सहज टाकून बघितले. विशेष म्हणजे या सा-या करामती मुलांनी आपल्या आई आणि वडिलांना अजिबात नाही सांगीतल्या. मात्र इस्टाग्रामवर शेअर केलेले व्हिडिओ आणि फ़ोटो क्षणात इतके वायरल झाले की दोनच दिवसांत त्यांना देशातुन तसेच जगभरातून चक्क ३३ मिलियन व्हिवर्स मिळाले आहेत. शिवांजलीच्यां नटखट अदा बघून घायाळ झालेल्या श्रद्धा कपूर, रिंकू राजगुरु, स्पृहा जोशी, श्रद्धा पवार आदि आघाडीच्या तारका तसेच इतर काही सेलिब्रेटिनी तर चक्क तिला फोन करून तिचे कौतुक केले आहे.

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

भुजबळ फार्मवर येण्याचे निमंत्रण धाडले

जेव्हा शिवांजली बाबत विचारपुस करण्यासाठी लोक व नातलग व्यक्ति फोन करू लागले. तेव्हा याबाबतची माहिती वडील विष्णु पोरजे यांना समजली. पालकमंत्री ना छगन भुजबळ यांनी देखील शिवांजलीचे कौतुक करत भुजबळ फार्मवर येण्याचे निमंत्रण धाडले असल्याचे कळत आहे. तर खासदार हेमंत गोडसे, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आणि इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर तसेच नाशिक मधील अनेक पत्रकारांनी देखील शिवांजली चे विशेष कौतुक करत तीला शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांत सोशल मिडियावर स्टार झालेल्या शिवांजलीमुळे इगतपुरीसह नाशिकचे नाव देखील उज्वलच झाले आहे.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव

आपल्या नटखट अदाकारीने समाज माध्यमातून लाखोंच्या संख्येने लाईक्स व फॉलोअर्स मिळवून सेलिब्रिटी व कलाकारांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या शिवांजली पोरजे हिचे अभिनंदन करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी तिच्या घरी जावून भेट घेतली आहे. त्यामुळे शिवांजलीवर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नेहमीच तिच्या कलागुणांना दाद देऊ

"माझी मुलगी शिवांजली इयत्ता तिसरीत शिकत आहे. घरात तिची नेमचीच अदाकारीने बड़बड़ असते. अभ्यासात देखील ती हुशार आहे मात्र तीच्या इतर काही कलाकृतीतुन भन्नाट काही करेल व जगभरात प्रसिद्ध होईल याची काही कल्पनाही नव्हती. लोकांचे जेव्हा फोन यायला सुरुवात झाली तेव्हा आमची शिवांजली आम्हाला समजली. आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. आम्ही नेहमीच तिच्या कलागुणांना दाद देत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
-विष्णु पाटील पोरजे, वडील
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous social media celebrity shivanjali porje nashik marathi news