नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे 'राखरांगोळी' आंदोलन 

उत्तम गोसावी
Wednesday, 23 September 2020

आता कुठे परवडतील, असे दर मिळायला लागले व जगाचा पोशिंदा बळीराजाच्या हातात दोन पैसे पडतील, अशी आशा होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. 

नाशिक/ओझर : कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी व शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. २३) शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार भारती पवार यांच्या नाशिक शहरातील घरासमोर राखरांगोळी आंदोलन करण्यात आले. या वेळी कांदा निर्यातबंदीच्या आदेशाची होळी करण्यात आली. 

शेतकऱ्यांचा विश्वासघात 

शासनाने नुकतेच शेतमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. या कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिली आहे. शासनाने या कायद्याचा भंग करून कांद्यावर निर्यातबंदी लादली आहे. गेले सहा महिने कांद्याला अतिशय कमी दर होते. त्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. आता कुठे परवडतील, असे दर मिळायला लागले व जगाचा पोशिंदा बळीराजाच्या हातात दोन पैसे पडतील, अशी आशा होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा

खासदार डॉ. पवार यांनी संसदेच्या अधिवेशनात कांदा उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडून कांदा निर्यातबंदी कायमची उठवावी व देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन खासदार डॉ. पवार यांना देण्यात आले. आंदोलनावेळी कोविड-१९ च्या सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले. या वेळी देवीदास पवार, अर्जुन बोराडे, शांताराम जाधव, तानाजी जाडे, कचरू बागूल, सुरेश जाधव, रामनाथ ढिकले, शंकर ढिकले, माणिक देवरे, भानुदास ढिकले, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब शेवले व इतर शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers agitation against onion export ban nashik marathi news