वीस दिवसांपासून सोडलेले पूरपाणी दुशिंगपूर तलावात पोहोचेना; संतप्त शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

अजित देसाई
Wednesday, 16 September 2020

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांना दुशिंगपूर येथील तलावाचा मोठा आधार आहे. पूर्व भागात पर्जन्यमान जेमतेम असल्याने या तलावात पाणी आणण्यासाठी भोजापूर धरणातून चार क्रमांकाची पूरचारी काढण्यात आली आहे. दरवर्षी भोजापूर धरण ओव्हरफ्लो होते. मात्र दुशिंपूर तलावात पाणी पोहचतच नाही.

नाशिक/सिन्नर : भोजापूर धरणातून गेल्या २० दिवसांपासून सोडण्यात आलेले अद्याप दुशिंगपूर तलावात न पोहचल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वीस दिवसांचा कालावधी उलटून देखील चारीद्वारे १६ किलोमीटर अंतर पाणी पार करत नसल्याने हे पाणी मुरते कुठे असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार यासाठी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

पाणी फक्त कागदोपत्री सोडल्याचा आरोप

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांना दुशिंगपूर येथील तलावाचा मोठा आधार आहे. पूर्व भागात पर्जन्यमान जेमतेम असल्याने या तलावात पाणी आणण्यासाठी भोजापूर धरणातून चार क्रमांकाची पूरचारी काढण्यात आली आहे. दरवर्षी भोजापूर धरण ओव्हरफ्लो होते. मात्र दुशिंपूर तलावात पाणी पोहचतच नाही. यंदा कधी नव्हे इतका जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील सर्व लहानमोठे बंधारे ओव्हरफ्लो झालेत. मात्र दुशिंगपूर तलाव नेहमीप्रमाणे अपवाद ठरला आहे. भोजापूर धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर २० दिवसांपूर्वीच पुरपाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सदर पाणी केवळ कागदोपत्री दुशिंगपूरसाठी सोडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय शिंदे, विठ्ठल उगले, नंदू गोराणे, कानिफनाथ घोटेकर, नबाजी खरात, खंडेराव दौंड, सखाराम घेगडमल, सुनील गोराणे, सखाराम कहांडळ, भास्कर कहांडळ,  ज्ञानेश्वर घोटेकर, कैलास ढमाले, अशोक घेगडमल यांच्यासह दुशिंगपूर, कहांडळवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या दोन-तीन दिवसात तलावात पाणी न पोहचल्यास प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल असा  इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

फक्त दुशिंगपूर  तलाव कोरडा

भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यावर पूरपाणी अगोदर शेवटच्या टोकाला असलेल्या दुशिंपूर तलावात सोडणे अपेक्षीत असते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे हे पाणीच अलीकडच्या काळात पोहोचलेले नाही. भोजापूर लाभक्षेत्रातील सर्व बंधारे, तलाव भरलेले असतांना केवळ दुशिंगपूर  तलाव कोरडा राहण्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा  आरोप विठ्ठल उगले यांनी केला आहे. 

हे सर्व ठेकेदाराची गैरसोय टाळण्यासाठी..

दुशिंगपूर तलावाची पाणी साठवण क्षमता ६७ एमसीएफटी इतकी आहे. त्यात सध्या दहा टक्केही पाणी नाही. याच तलावाच्या मध्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे बांधकाम अपूर्ण असून पाणी तलावात आल्यास ठेकेदारास पुढची दोन वर्षे तरी काम बंद ठेवावे लागेल. केवळ समृद्धी ठेकेदाराची गैरसोय टाळण्यासाठीच पाटबंधारे विभाग भोजापूरचे पुरपाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे असे डॉ. विजय शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers are angry as the water did not reach the lake nashik marathi news