दिंडोरी तालुक्यात खरिपाकडून बळीराजाची निराशा; भाजीपाल्याचा आधार

संदीप मोगल 
Sunday, 25 October 2020

मोठ्या पावसात या भागातील शेतकरी वर्गाने आपल्या शेतामधील भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित करून ते वाचविण्यासाठी जिवाचे रान करीत पिके वाचविली आहेत. यामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकरीवर्गाला भाजीपाला पीक आधार देईल, अशी आशा आहे.

नाशिक/लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिल्याने कोरोनाच्या काळातील भरपाई भरून निघेल, अशी आशा आहे. 
रब्बी व खरीप हंगामात कोणत्याही पिकाला हमीभाव न मिळाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी तालुक्यातील परमोरी, लखमापूर, दहेगाव वागळूद, ओझरखेड, म्हेळुस्के परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांचा कल बदलवत शेतामध्ये वांगी, फ्लॉवर, कोबी, मिरची, कोथिंबीर, लसूण अशा भाजीपाला लागवडीला पसंती दिली.

नगदी भांडवल मिळण्याची अपेक्षा

सुरवातीच्या काळात वातावरणातील बदलाचा व पावसाच्या लहरीपणाचा भाजीपाला पिकावर परिणाम झाला. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोगाचा प्रादुर्भाव भाजीपाला पिकांवर दिसण्यास सुरवात झाली. अनेक महागड्या औषधांची फवारणी वेळोवेळी करावी लागली. त्यात परतीच्या पावसाने तर कहर करीत लाखो रुपयांचे नुकसान केले. आता एवढे महाग भाजीपाला बियाणे खरेदी करून पावसाने वाया जाते की काय? अशी भीती निर्माण झाली होती. परंतु मोठ्या पावसात या भागातील शेतकरी वर्गाने आपल्या शेतामधील भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित करून ते वाचविण्यासाठी जिवाचे रान करीत पिके वाचविली आहेत. यामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकरीवर्गाला भाजीपाला पीक आधार देईल, अशी आशा आहे. सध्या वांगी, फ्लॉवर, मिरची बहर धरीत असून, यावरील शेतकरी वर्गाला अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. यातून पुढील हंगामासाठी नगदी भांडवल तयार होईल, अशी चिन्हे आहेत. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

सध्या दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे वांगी पिकाला शेतकरी वर्गाने पसंती देऊन अनेक कष्टांतून हे पीक उभे केले आहे. आम्ही दोन्ही हंगामांत काही पिके घेतली, त्यात द्राक्षाची पूर्णपणे वाट लागली. काही नगदी भांडवल मिळून देणारी पिके घेतली. परंतु कोरोनामुळे कवडीमोल झाली. उत्पन्नाची सरासरीही मिळाली नाही. त्यातून आम्ही नवीन वांगी शेतीत लागवड केली. आम्हाला पुढील हंगामासाठी नगदी भांडवल तयार होईल, अशी अपेक्षा आहे.  - सुनील निमसे, शेतकरी, दहेगाव 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are getting financial support from vegetable crops nashik marathi news