शेतकरी ऑनलाइन पण पोर्टल ऑफलाइन! योजनांच्या लाभाची घोषणा हवेतच 

farmer online.jpg
farmer online.jpg

नाशिक / चांदवड : सर्वच क्षेत्रांत ऑनलाइन, सर्वकाही ऑनलाइन झाले. शेतकरीसुद्धा ऑनलाइन झालेत. मात्र, शेतीच्या योजनांसाठीचा ऑनलाइन अर्ज करावयास असणारे महा डीबीटी पोर्टल वर्षभरापासून बंद आहे. शेतकऱ्यांना एका अर्जावर कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल, एका शेतकऱ्याला एकदाच अर्ज करावा लागेल, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली. मात्र पोर्टलच बंद असल्याने योजनांचा अर्ज करायचा कुठे? योजनांचा लाभ मिळणार तरी कधी? हे वर्ष प्रतीक्षेत जाणार काय? असे अनेक प्रश्न बळीराजाला त्रस्त करत आहेत. 

शासनाच्या सूचना येईपर्यंत कुणीही नोंदणी करू नये
अशातच पोर्टल सुरू झाले व योजनांचे अर्ज स्वीकारणे सुरू झाल्याची माहिती सोशल मीडियावर पसरल्याने शेतकऱ्यांनी गर्दी केली. याचा फायदा घेऊन काही केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांकडून कागदपत्रे स्वीकारून नोंदणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही नोंदणी पोर्टल बंद असल्याने अपूर्णावस्थेत राहते. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने चांदवड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी शासनाच्या सूचना येईपर्यंत कुणीही नोंदणी करू नये, असे आवाहन करणारे पत्रक काढले आहे. 

लवकरात लवकर या पोर्टलचा तपशील घ्यावा
गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महाडीबीटीचे काय आहे नेमकं रहस्य? हा चर्चेचा विषय बनलेला आहे. सद्यःस्थिती पाहता या पोर्टलला नोंदणी सोडून दुसरं काहीच करता येत नाही. शासन योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. योजना सुरू झाल्याची चाहूल लागताच शेतकरीवर्ग जवळच्या सायबर कॅफेला भेट देतात व सोशल मीडियाच्या अफवांना बळी पडतात. काम होईल, या आशेने शेतकरी कॉम्प्युटर ऑपरेटर मागतील तितके पैसे खर्च करतात. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर या पोर्टलचा तपशील घ्यावा व योजनांचे सादरीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

हेही वाचा > ब्रेकिंग : नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

शेतकऱ्यांना एका अर्जावर कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. - संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक 

आम्हाला कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही शासनाचे पोर्टल कधी सुरू होईल याची वाट पाहत आहे. -विठ्ठल साठे, शेतकरी, कातरवाडी (ता. चांदवड) 

पोर्टलवर नोंदणी करता येणाऱ्या योजना 
* प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना * कृषी यांत्रिकीकरण उपअभियान * राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, अन्न-धान्य तेलबिया ऊस व कापूस * बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना * डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना * एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान * कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम * भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना * राष्ट्रीय कृषी विकास योजना * राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना * मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com