शेतकऱ्यांना रोखीने पैसे देण्यास आयकर विभागाचा खोडा? लासलगाव बाजार समितीतील प्रकार

विजय काळे
Thursday, 12 November 2020

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यासह भुसार शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना रोख पैसे न देता व्यापाऱ्यांकडून धनादेश (चेक) दिले जात असल्याने शेतकऱ्यांना गरजेच्या वस्तू खरेदी न करता आल्याने रिकाम्या हाती घरी परतावे लागत आहे

रेडगाव खुर्द (नाशिक) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यासह भुसार शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना रोख पैसे न देता व्यापाऱ्यांकडून धनादेश (चेक) दिले जात असल्याने शेतकऱ्यांना गरजेच्या वस्तू खरेदी न करता आल्याने रिकाम्या हाती घरी परतावे लागत आहे. पिंपळगाव, चांदवड बाजार समितीत रोख पैसे मिळत असताना लासलगावला का नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून शेतकरीवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

लासलगाव बाजार समितीतील प्रकार; व्यापाऱ्यांचे आयकर विभागाकडे बोट 
याबाबत लासलगाव व्यापारी असोसिएशनने पत्र देऊन खुलासा केला आहे, की आयकर विभागाच्या शेतकऱ्यांना रोख पैसे देऊ नये, या अघोषित निर्बंधामुळे यापुढे पुढील निर्णय येईपर्यंत धनादेशाद्वारे पैसे अदा केले जातील. आयकर विभागाची ही भूमिका शेतकरीविरोधी असून, इथे पूर्वापार शेतकऱ्यांना रोख पैसे देण्याची पद्धत आहे. शेतमाल विक्रीनंतर शेतकरी गरजेपोटी अनेक वस्तूंची खरेदी करतो. मात्र पैसे मिळत नसल्याने सध्या त्याला बाजारातून रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. चेकमुळे बँकेत रांगेत उभे राहून पुन्हा पैसे जमा झाले की नाही, याची चौकशी करण्यातच निम्मा वेळ जात आहे. अनेक शेतकऱ्यांना लिहिता व वाचता येत नाही, त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. त्यामुळे केंद्राच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या आयकर विभागाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

 

शेतकऱ्यांना रोखऐवजी चेकद्वारे पैसे 
आयकर विभागाच्या धाडीनंतर व्यापाऱ्यांनी बाजार समितीला पत्र देऊन धनादेशाद्वारेच पैशांचे वाटप केले जाईल, या अटीवरच ते लिलावात सहभागी झाले. -नरेंद्र वाढवणे, सचिव कृउबा लासलगाव 

आम्ही आधी शेतकरीहितालाच प्राधान्य देतो. परंतु आयकर विभागाने रोखीने पैसे वाटपावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने तसा निर्णय घ्यावा लागला. व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दलही कुणीतरी बोलायला हवे. -नंदकुमार डागा, व्यापारी असोसिएशन प्रतिनिधी 

पैशांची गरज असते तेव्हाच शेतकरी बाजारात शेतमाल विक्रीला आणतो. त्यामुळे त्याला रोखीनेच पैसे मिळावेत. परंतु आयकर विभागाने अशी भूमिका घेतली असेल, तर त्याची माहिती घेतली जाईल. -डॉ. भारती पवार, खासदार 
 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers pay by check instead of cash lasalgaon nashik marathi news