भूसंपादनाच्या प्रक्रियेची पुन्हा उचल! जमिनी वाचविण्यासाठी शेतकरी संरक्षणमंत्र्यांची घेणार भेट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

अनेक शेतकरी भूमिहीन होऊन आज बेरोजगारदेखील झालेले आहेत आणि आता पुन्हा जर हिरव्या झोनमधील धरण क्षेत्रालगत असलेल्या धामणगाव, गंभीरवाडी आणि बेलगाव तऱ्हाळे या गावांतील शेतकऱ्यांची जमीनही फायरिंग रेंजसाठी अतिरिक्त भूसंपादित झाली तर शेतकरी भूमिहीन होईल. 

नाशिक : (सर्वतीर्थ टाकेद) अत्याधुनिक तोफांच्या सरावासाठी नाशिक रोड तोफखाना केंद्राची 'फायरिंग रेंज' विस्तारण्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या तक्रारी करीत, परिसरातील शेतकऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. घोटी-सिन्नर महामार्गाजवळ धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे येथील दारणा नदीतीरावरील जमिनींच्या फायरिंग रेंज भूसंपादनप्रश्नी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आमदार विनायक मेटे यांची भेट घेऊन शेतजमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली. 

शेतजमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

दहा वर्षांपासून लष्कराने घोटी-सिन्नर महामार्गावरील धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे या तीन गावांतील जागांसंदर्भात संरक्षण खात्याने अहवाल मागविला होता. लष्करातील तोफखाना स्कूलमधील जवानांना लष्करी अधिकाऱ्यांमार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी तिन्ही गावांतील जमिनी फायररिंग रेंजसाठी गरजेच्या आहेत. या भागात रेंजस आहे व जे अंतर बोफोर्स, इंडियन फील्ड, गनलाइट फील्ड गन आदी १७ ते ४२ किलोमीटरपर्यंत मारक क्षमतेच्या तोफांचा पूर्ण क्षमतेने सराव व मारा करण्यासाठी लागते त्या अंतरासाठी या भागात जमिनीची गरज आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे २०११ मध्ये त्या वेळेसही शेतकऱ्यांनी भूसंपादन करू नये यासाठी मागणी केली होती. त्यानंतर २०१६ नंतर आताही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पण शेतकऱ्यांनी भूसंपादनाबाबत माहिती दिली. 

तर शेतकरी भूमिहीन होईल... 

गुरुवारी येथील शिवसंग्राम जिल्हाप्रमुख अमित जाधव, महेश गाढवे पाटील, ज्येष्ठ नेते पांडुरंग गाढवे आदींनी श्री. मेटे यांना भेटून निवेदन दिले. इगतपुरी तालुक्यातील बरीच जमीन भूखंड धरणे, औद्योगिक वसाहती, रेल्वे, समृद्धी महामार्ग, पेट्रोल लाइन, लोहमार्ग यासाठी अधिग्रहीत झाली आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होऊन आज बेरोजगारदेखील झालेले आहेत आणि आता पुन्हा जर हिरव्या झोनमधील धरण क्षेत्रालगत असलेल्या धामणगाव, गंभीरवाडी आणि बेलगाव तऱ्हाळे या गावांतील शेतकऱ्यांची जमीनही फायरिंग रेंजसाठी अतिरिक्त भूसंपादित झाली तर शेतकरी भूमिहीन होईल. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

इगतपुरी तालुक्यातील जमिनी आतापर्यंत विविध प्रकल्पांसाठी संपादित झाल्या असून, आता पुन्हा लष्करातील तोफखाना स्कूलमधील जवानांना फायर रेंजस प्रशिक्षणासाठी धरणालगतच्या बागायती जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. केंद्रीय संरक्षणमंत्र्यांना भेटून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. - महेश गाढवे, शिवसंग्राम जिल्हा कार्याध्यक्ष 

जर लष्कराने फायर रेंजससाठी आमच्या शेतजमिनी अधिग्रहीत केल्या तर आम्ही जगायचे कसे यासाठी आता आम्ही एक इंचसुद्धा जागा देणार नाही. - पांडुरंग गाढवे, शेतकरी धामणगाव  

हेही वाचा >  भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will meet defense minister to save lands nashik marathi news