बर्ड फ्लूच्या धास्तीने चिकन व्यवसाय मंदावला; दर थेट निम्म्यावर

युनूस शेख
Sunday, 10 January 2021

चिकन व्यावसायिकांकडून खरेदी केली जाणाऱ्या कोंबडीचे प्रमाण निम्म्यावर आल्याने जिल्हा अंतर्गत पुरवठाही मंदावला आहे. सर्वांचा उद्योग ठप्प झाला आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक संख्या घटली आहे. शिवाय जे ५० टक्के ग्राहक येत आहे. त्यांच्यात भीती दिसून येत आहे. 

जुने नाशिक : राज्यात बर्ड फ्लूचा कुठला धोका नसताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे चिकन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, दर निम्म्यावर आले आहेत. शिवाय गुजरात आणि मुंबईत कोबड्यांचा होणारा पुरवठादेखील निम्मा झाला आहे. राज्यात बर्ड फ्लूचा कुठलाही धोका नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांच्या मनात बर्ड फ्लूला घेऊन प्रचंड भीती दिसत आहे. 

गुजरात, मुंबईला होणारा पुरवठा घटला 

तीन ते चार दिवसांपूर्वी चिकनचे दर १७० ते २०० रुपये होते. तर जिवंत कोबडी १०५ रुपयांत मिळत होती. आज १०० ते १२० रुपये किलो चिकन, जिवंत कोंबडी ८० रुपयांत मिळत आहे. व्यापारी किंवा शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्याकडून व्यावसायिकाना ९० ते ९५ रुपयांत कोंबडी विक्री केली जात. आज ५५ रुपयांवर विक्री आली आहे. चिकन व्यावसायिकांकडून खरेदी केली जाणाऱ्या कोंबडीचे प्रमाण निम्म्यावर आल्याने जिल्हा अंतर्गत पुरवठाही मंदावला आहे. सर्वांचा उद्योग ठप्प झाला आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक संख्या घटली आहे. शिवाय जे ५० टक्के ग्राहक येत आहे. त्यांच्यात भीती दिसून येत आहे. 

पुरावठा थंडावला 

शहर-जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा माल गुजरात राज्यासह मुंबईला जात असतो. गुजरातमध्ये दैनदिन सुमारे १०० ते १५० टन माल जातो. सध्या ५० टन माल जात आहे. मुंबईचा विचार केला तर २०० ते ३०० टन माल जात होता. तो १०० ते १५० टनावर आला आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

बर्ड फ्लूसंदर्भात आवश्‍यक सूचना आल्या आहेत. मात्र, राज्यासह जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी रोगाबाबत कसलीही भीती न बाळगता बिनधास्तपणे चिकन, अंडी, मांस यांचे सेवन करावे. इतर राज्यांत हा रोग केवळ कावळे व इतर वन्यजीवांमध्ये आढळला आहे.  - डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद 

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. निम्म्यावर चिकन विक्रीचे प्रमाण आले आहे. चिकन विक्रीबरोबर जनजागृतीचे कामही करावे लागत आहे. - शाहनवाज मुलतानी, चिकन व्यावसायिक 

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात कोबड्यांचे पालनपोषण केले जात आहे. वेळोवेळी लसीकरणही होत. सध्यातरी कोंबड्यांमध्ये कुटलाही रोग नाही. नागरिकांनी उगाच भीती बाळगू नये. - बापू ताजणे, शेतकरी  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of bird flu slows down chicken business nashik marathi news