एकनाथ खडसेंचे भाजपविरोधात धक्कातंत्र! पंधरा आमदार संपर्कात असल्याचा धक्कादायक दावा

विक्रांत मते
Sunday, 25 October 2020

अनेक भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा आहे. परंतु चिन्हावर निवडून आल्याने त्यांना वाट पाहावी लागेल, असे त्यांनी सांगितले. सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे असल्याचे वक्तव्य माझे नव्हते. माजी मंत्री राम शिंदे यांनी साक्षीदार फोडल्याचा केलेला आरोप बालिशपणाचा असल्याचे ते म्हणाले. 

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल की टिकेल, यावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपलाच धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले आहे. भाजपचे बारा ते पंधरा आमदार माझ्या संपर्कात असून, लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करताना खानदेशात नाथाभाऊ म्हणून आत्तापर्यंत मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करणे माझ्यासाठी आव्हान नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी शनिवारी (ता. २४) येथे दिले. 

हा आरोप बालिशपणाचा

मुंबईतून जळगावकडे जात असताना नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर खडसे यांचे शनिवारी दुपारी आगमन झाले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. माध्यमांशी बोलताना श्री. खडसे म्हणाले, खानदेशात राष्ट्रवादीचा विस्तार करणे माझ्यासाठी आव्हान नाही. साधा कार्यकर्ता म्हणून काम करणे मला आवडेल. राष्ट्रवादी प्रवेशानंतर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भाजपच्या नाराज नेत्यांचादेखील त्यात समावेश आहे. अनेक भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा आहे. परंतु चिन्हावर निवडून आल्याने त्यांना वाट पाहावी लागेल, असे त्यांनी सांगितले. सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे असल्याचे वक्तव्य माझे नव्हते. माजी मंत्री राम शिंदे यांनी साक्षीदार फोडल्याचा केलेला आरोप बालिशपणाचा असल्याचे ते म्हणाले. 

आता तणावमुक्त, इतरांनी सांभाळावे 

माझ्यावर अन्याय झाल्याची कैफियत अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे मांडली. विधानसभेतही माझा गुन्हा काय हे सांगा, असे वारंवार विचारले; परंतु उत्तर मिळाले नाही. फडणवीस यांनी योग्य वेळी बोलण्यापेक्षा सभागृहात मी विचारलं तेव्हा बोलायला हवे होते. सार्वभौम सभागृहात उत्तर देण्याला खूप महत्त्व असतं. आता तणावमुक्त असून, इतरांना तणावाखाली आणल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान देत आता ईडी, बीडी, सीडी व काडी हे सर्व कळेल असे सूचक विधान श्री. खडसे यांनी केले. ज्यांच्यामुळे मला पक्षातून जावे लागले त्या देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळले, ते लवकर बरे होवोत, या शब्दात शुभेच्छा व्यक्त केल्या. 

चंद्रकांतदादांची मर्यादा चॉकलेटपर्यंत 

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे नाव महाराष्ट्राला समजले. त्यांनी कधी आंदोलन बघितले नाही ना जेलमध्ये. चंद्रकांतदादा फक्त चॉकलेट ते कुल्फीपर्यंतचं पक्षात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी, हे काही दिवसांत कळेल. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका. पक्ष सोडत असताना मला कोणी फोन केला नाही. तसे झाले असते तर मी किमान फेरविचार केला असता. भाजपमध्ये आता ‘वापरा व फेका’, ही प्रवृत्ती बळावल्याचा आरोप श्री. खडसे यांनी केला. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

एकनाथ खडसे म्हणाले... 

- राज्यात सत्तांतरासाठी ४० आमदारांची गरज 
- भाजपला सत्ता उलथवणे शक्य नाही 
- राज्यातील सरकार पडणार नाही 
- भाजपमध्ये बहुजन चेहऱ्यांचा वानवा 
- प्रशासनात माझ्या शब्दाला मोल, मंत्रिपदाचा अट्टहास नाही 
- अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या वाचून करमणूक 
- चार वर्षे भीतीखाली राहिलो, आता तणावमुक्त  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen more MLAs on the verge of leaving BJP nashik marathi news