बायोडिझेलचा दिवसाला ५० हजार लीटरचा भरणा; परवानग्या न घेताच विक्री

biodisel 1.jpg
biodisel 1.jpg

नाशिक/मालेगाव : दक्षिण भारतातील बंगळूर- पुणे महामार्ग पुढे पुणे- मालेगाव दरम्यान मुंबई- आग्रा या उत्तरेच्या महामार्गाला मिळतो. दक्षिण-उत्तरेसह पश्‍चिम राज्यांना जोडणारे मालेगाव मध्यवर्ती हब असल्याने देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील नावलौकिक असलेल्या व्हीआरएल लॉजिस्टिकने कंपनीच्या वाहनांना बायोडिझेल भरण्यासाठी मालेगाव या शहराची निवड केली.

परवानगी न घेताच पंप सुरू

बायोडिझेल विक्री प्रकरणात व्हीआरएल लॉजिस्टिकने पेट्रोलपंपासाठी औद्योगिक-वाणिज्य, महसूल, महामार्ग या विभागांची परवानगी न घेता फक्त ग्रामपंचायतीचे ना हरकत व वैद्यमापनचे प्रमाणपत्र यावरच पंप सुरू केला असल्याची समोर येत आहे. या पंपावर रोज सरासरी ५० हजार लीटर बायोडिझेल भरले जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

चंदनपुरी शिवारात कारवाई

वाटपाचा डिसप्ले, बायोडिझेल साठ्याची ३० हजार लीटरची टाकी व पत्रा शेडची कॅबीन सील केली. बायोडिझेलचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.

बायोडिझेल विक्रीबद्दल अनेक प्रश्न 

शनिवारी (ता. ५) तहसीलदार राजपूत यांनी व्हीआरएल मुख्यालय हुबळी येथे बायोडिझेल विक्रीबाबतच्या केंद्राच्या ३० एप्रिल २०१९ च्या राजपत्रानुसार कोणकोणत्या परवानग्या घेतल्या ते मूळ कागदपत्रांसह ११ सप्टेंबरपर्यंत हजर करण्याचे आदेश काढले. व्हीआरएल पंपावरून कंपनीच्या वाहनांना बायोडिझेल टाकले जात असले तरी वाहनांचे टँक पंपावर फुल होते? काकीनाडा येथून येणारे बायोडिझेल हे डिझेल मिश्रित असते का? राज्य परिवहन महामंडळाच्या पेट्रोलपंपाला सर्व परवानग्या आवश्‍यक असताना व्हीआरएलच्या पंपांना परवानगीची आवश्‍यकता नाही का? असा प्रश्‍न नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले, सचिव सुदर्शन पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासाठी बायोडिझेलचे नमुने तपासणीचा अहवाल तातडीने मागवावा, अशीही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

इथेनॉल उद्योगगात ११ हजार कोटीची उलाढाल

देशात इथेनॉल व बायोडिझेलला चालना देण्याचे केंद्राचे धोरण आहे. २६ जानेवारीला स्पाईसजेट विमानाची चाचणी झाली. विमानाने डेहराडून ते दिल्ली उड्डाण केले. विमानात २५ टक्के बायोडिझेल व ७५ टक्के डिझेलचा वापर झाला. पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान, नितीन गडकरी यांचे ११ हजार कोटीची उलाढाल असलेला इथेनॉल उद्योग २ लाख कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. इथेनॉलसाठी १० हजार कोटी गुंतवणुकीतून बारा बायोफ्युएल रिफायनरीची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. इथेनॉलही पेट्रोलमध्ये मिश्रण करुनच वापरतात. त्याचप्रमाणे डिझेलमध्ये मिश्रण करुनच बायोडिझेल वापरावे, असे केंद्राचे स्पष्ट निर्देश आहेत.

अवैध बायोडिझेल विक्री

मध्यप्रदेशात देपालपूर, बेतमा येथे विनापरवाना बायोडिझेल विक्री करणारे सात पंप तेथील अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सील केले. वर्षभरात महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरातमध्ये अवैध बायोडिझेल विक्री व्यवसाय फोफावला. त्याचा शासन महसुलावर परिणाम झाला. तक्रारी येताच महसूल विभागाने त्याला चाप लावला. 

बायोडिझेल पंपांना अधिकृत परवानगी द्या : रतन देवरे 

जैव इंधनाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. याकरिता बायोडिझेल पंप सुरू करण्यासाठीच्या आवश्‍यक परवानग्या तातडीने द्याव्यात. राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी बायोडिझेल पंपासाठी जमिनीसह अन्य गुंतवणूक केली आहे. रीतसर परवाना मिळाल्यानंतर बायोडिझेल पंप सुरू झाल्यास परदेशातून इंधनाची आयात कमी होऊन देशाचा फायदाच होईल. यासाठी बायोडिझेल पंपांना आवश्‍यक परवाने द्यावेत अशी मागणी बायोडिझेल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रतन देवरे, उपाध्यक्ष शांतीलाल पवार, सचिव योगेश पाटील आदींनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषिमंत्री, पुरवठा विभागाचे प्रधान सचिव व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


आकडे बोलतात... 
व्हिआरएलचा वाहतूक विस्तार 

खासगी प्रवासी बस 
४५० 

ट्रक 
चार हजार 

संपादन - ज्योती देवरे
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com