विनामास्क पाचशे नव्हे, आता दोनशे रुपये दंड; आयुक्तांनी का केली अशी सूचना? वाचा

विक्रांत मते
Thursday, 17 September 2020

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक विनामास्क वावरत असल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी नगरसेवकांच्या मागणीनुसार शहरात पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता; परंतु

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, चाळीस हजारी पार रुग्णांचा आकडा जाण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घेतरी तरच कोरोनाला अटकाव शक्य होणार आहे. ऑनलाइन महासभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. आयुक्त कैलास जाधव यांना शहरात फेरफटका मारताना अनेक लोक निष्काळजीपणे वागत असल्याचे निदर्शनास आले. विनामास्क शेकडो लोक रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने आयुक्तांनीही कठोर भूमिका घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले होते.

महापौरांनी पाचशे रुपये दंडाचा निर्णय घेतला होता पण

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक विनामास्क वावरत असल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी नगरसेवकांच्या मागणीनुसार शहरात पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता; परंतु नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आयुक्त कैलास जाधव यांनी विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना पाचशेऐवजी दोनशे रुपये दंड आकारण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या असून, याची तातडीने अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

अंमलबजावणी करताना वेगळी बाब समोर

ऑनलाइन महासभेत कोविड विषयावर झालेल्या चर्चेनंतर महापौर कुलकर्णी यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या मदतीने पाचशे रुपये दंड आकारणीच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. नागरिकांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले होते. परंतु निर्णयाची अंमलबजावणी करताना नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचादेखील विचार झाला पाहिजे. सध्या कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी लोकांना बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. या बाबी लक्षात घेऊन दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून, विभागीय अधिकाऱ्यांमार्फत दंड वसूल केला जाणार आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हाच एकमेव उपाय असल्याने मास्क न वापरणाऱ्यांनी नियमांचे पालन केले पहिजे. दंडात्मक आकारणी करताना शिस्त लागावी हा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे २०० रुपये दंड आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. 
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका 

 
संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fine of 2 hundred rupees for not wearing a mask nashik marathi news