प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुणांची पाच टक्‍के सवलत; उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे अधिसूचना  

अरुण मलाणी
Tuesday, 13 October 2020

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष प्रभावित झालेले असून, विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी किमान ४५ टक्‍के गुण असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष प्रभावित झालेले असून, विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी किमान ४५ टक्‍के गुण असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. राखीव प्रवर्गासाठी आणखी कमी टक्क्‍यांची अट असेल. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तशी अधिसूचना जारी केली आहे. 

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुणांची पाच टक्‍के सवलत
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र शाखेसह अन्‍य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियेला गती आलेली आहे. राज्‍य स्‍तरावरील एमएचटी-सीईटीसह अन्‍य विविध अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा पार पडत आहेत. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्‍यानंतर कॅप राउंडच्‍या माध्यमातून प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या फेरीत सहभागी होण्यासाठी खुल्‍या प्रवर्गाच्‍या विद्यार्थ्यांना किमान पन्नास टक्‍के गुणांची, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साधारणतः ४५ टक्‍के किमान गुणांची अट होती.

उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे अधिसूचना

त्यात, शिथिलता आणून आता खुल्‍या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्‍के, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चाळीस टक्‍के किमान गुणांची अट असणार आहे. या निर्णयाच्‍या आधारे अभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्म.), विधी (एलएलबी), हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी (एमएमसीटी) अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. दरम्‍यान, पदविका शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी आता ४५ टक्‍के गुणांची अट असेल, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

प्रथम वर्षात प्रवेशाची संधी 
दरम्‍यान, डी. फार्म. हे पदविका शिक्षण पूर्ण झाल्‍यानंतर थेट द्वितीय वर्ष बी. फार्म.करिता प्रवेश मिळू न शकलेल्‍या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती असते. अशा विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा न घेता, यापूर्वीच्‍या प्रवेश पद्धतीप्रमाणे प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्याची तरतूद करणे आवश्‍यक असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. यासंदर्भातही आवश्‍यक सुधारणा करण्याची मागणी होते आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशात गुणांची शिथिलता देण्याचा निर्णय योग्‍य असून, यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांचे अभिनंदन करतो. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्‍या अधिसूचनेचा राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल. -डॉ. राजेंद्र भांबर, प्राचार्य- एमजीव्‍हीचे फार्मसी महाविद्यालय  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five percent discount on marks for admission nashik marathi news