गावातील शुद्ध पाण्यावर राहणार आता महिलांचीच नजर; कसे ते वाचा

कुणाल संत
Sunday, 24 January 2021

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १ हजार ९३२ गावातील प्रत्येकी ५ महिलांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक खासगी स्रोत यांची माहिती देण्यात आली. 

नाशिक : गावातील शुद्ध पाण्यावर आता गावातील महिलांचीच नजर राहणार आहे. फिल्ड टेस्ट किट (FTK) व्दारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याबाबत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील प्रती ग्रामपंचायत पाच महिलांना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद नाशिक यांच्यावतीने ऑनलाइन प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. 

पाच जणांवर जबाबदारी 

त्यानुसार आता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्याबरोबरच गावात शुध्दपाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे. शासनाच्या निर्देशानुसार पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ५ महिलांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १ हजार ९३२ गावातील प्रत्येकी ५ महिलांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक खासगी स्रोत यांची माहिती देण्यात आली. 

ही माहिती मिळणार...

पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची निगा अशी राखावी व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम, पाणी गुणवत्ता विषयक तपासणी, फिल्ड टेस्ट किट चा वापर कसा करावा, त्याचा वापर करून कशी पाणी तपासणी केली जाते. तसेच सदर किट कसे हाताळावे याबाबत माहिती देण्यात आली. पाण्याची गुणवत्ता ढासळल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण कसे करावे, याबाबत माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

ऑनलाइन प्रशिक्षण 

पाणी व स्वच्छता विभागातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्यासह जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक सुरेश जाधव व पाणी गुणवत्ता सल्लागार भाग्यश्री बैरागी, रवींद्र बाराथे यांनी उपस्थित महिलांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले. दरम्यान, गावातील ग्रामस्थांना शुद्ध आणि स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे गरजेचे आहे. गावाला शुद्ध पाणी देण्यासाठी आता ग्रामस्तरावर पाण्याशी ज्यांचा अधिक संबंध येतो त्या महिलाच निगराणी ठेवणार असल्याने निश्चितच याचा फायदा होणार असल्याची माहिती बनसोड यांनी दिली. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five women per gram panchayat will get training on pure water nashik marathi news