
निवडणूक काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावी. प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी हेल्प डेस्कची निर्मिती करून त्याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने उमेदवाराचे नामनिर्देशन व घोषणापत्र भरून घ्यावे.
नाशिक : दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे मत काही देशांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करूनच विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.
शासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक
गमे म्हणाले, नाशिक विभागात एकूण दोन हजार ४७६ ग्रामंपचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२१, नगर ७६७, जळगाव ७८३, धुळे २१८, तर नंदुरबार जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावी. प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी हेल्प डेस्कची निर्मिती करून त्याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने उमेदवाराचे नामनिर्देशन व घोषणापत्र भरून घ्यावे.
हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर
ईव्हीएम निवडणुकीपूर्वी व मतमोजणीनंतर जिथे ठेवण्यात येतील त्या ठिकाणाची पाहणी करावी. आयोगाच्या सूचनेप्रमाणे देण्यात आलेल्या भागामध्ये सहा वेळा पाहणी करून परिपूर्ण अहवाल पाठवावेत. तसेच, नियमावलीतच काम करणे आवश्यक असून, कुठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये. ग्रामपंचायत निवडणूकप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी पूर्वतयारी करावी, अशा सूचना गमे यांनी या वेळी दिल्या.
हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ
झूम ॲपद्वारे आढावा बैठक
विभागीय आयुक्तालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मंगळवारी (ता. २२) झूम ॲपद्वारे आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, डॉ. राजेंद्र भोसले, संजय यादव, अभिजित राऊत, डॉ. राजेंद्र भारूड आदींसह प्रांताधिकारी व तहसीलदारांनी सहभाग घेतला.