#COVID19 : लक्षात घ्या.. जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलेले 'हे' चार निर्णय! 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी यापूर्व 16 आदेश काढले आहेत. त्यात आणखी चार महत्त्वपूर्ण आदेश काढले.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी पुढील धोके टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवारी (ता. 21) चार महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात फेरीवाल्यांकडून होणाऱ्या खाद्यपदार्थ, इतर वस्तू आणि मद्यविक्रीस बंदी घालत औद्योगिक कारखाने, औद्योगिक संस्था व इतर आस्थापनांत 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करणे व बॅंकांमध्ये चार किंवा पाच ग्राहकांना प्रवेश देण्यात यावा, तसेच फक्त रोख भरणा करणे व काढणे हीच कामे प्राधान्याने करण्यात यावीत, या आदेशांचा समावेश आहे. 

रस्त्यावरील विक्री, दारूविक्री, कारखाने, बॅंकांना विशेष सूचना 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी यापूर्व 16 आदेश काढले आहेत. त्यात आणखी शनिवारी चार महत्त्वपूर्ण आदेश काढले. यात जिल्ह्यात सुरू असलेल्या औद्योगिक आस्थापनांमध्ये विविध कामगार व कर्मचारी, अधिकारी हे वेगवेगळ्या भागातून प्रवास करून येत असल्याने संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात घेत जिल्ह्यामधील सर्व औद्योगिक कारखाने, औद्योगिक संस्था 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवाव्यात, असे सूचित केले आहे. दुसऱ्या आदेशात जिल्ह्यात फेरीवाल्यांच्या वाहने व हातगाड्यांवर होणाऱ्या गर्दीमुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो ही बाब लक्षात घेत फेरीवाल्यांवरही बंदी घातली आहे.

तिसऱ्या आदेशात जिल्ह्यातील सर्व प्रकारची दारूविक्री व बार शनिवारी (ता. 21) सायंकाळी सहापासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात जिल्ह्यातील बार, देशी दारू किरकोळ विक्री, विदेशी दारूविक्री, बार, क्‍लब आणि मद्यविक्रीचे सर्व परवाने अथवा दुकाने, शहर-जिल्ह्यातील पंचतारांकित हॉटेल, रिसोर्ट आदींना लागू आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी
चौथ्या आदेशात जिल्ह्यामधील सर्व बॅंकांनी 31 मार्चपर्यंत फक्त रोख भरणा करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावीत. बॅंकेत चार किंवा पाचपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवावे, डिजिटल बॅंकिंग व्यवहाराच्या ग्राहकांना आवाहन करावे, असे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four orders from collectors to prevent Corona outbreak Nashik Marathi news