जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच...'त्या' दहा रुग्णांचे मृत्युपश्‍चात पॉझिटिव्ह रिपोर्ट!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयातील तीन परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, मंगळवारी (ता. 23) जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका व पुरुष कर्मचाऱ्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे तिघेही सिव्हिलच्या कोरोना कक्षातील अतिदक्षता विभागातील आहेत.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, त्यात वाढत्या मृतांची भर पडते आहे. मंगळवारी (ता. 23) जिल्ह्यात आणखी 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील आठ तर जिल्ह्यातील सहा मृतांचा समावेश आहे. तर, दहा रुग्णांच्या मृत्युनंतर त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. दोघांचा सोमवारी (ता.22) रात्री तर दोघांचा मंगळवारी (ता.23) उपचारादरम्यान मृत्यु झालेला आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे 166 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. 

जिल्ह्यात कोरोनामुळे 189 मृत्युमुखी
  
जिल्ह्यातील कोरोना मृतांमध्ये मंगळवारी (ता. 23) 14 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 189 झाला आहे. नाशिक शहरातील आठ मृतांचा समावेश असून, यात जुन्या नाशिकमधील काझीपुऱ्यातील 55 वर्षीय आणि कथडा येथील 50 वर्षीय या दोघा कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा मंगळवारी (ता.23) उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर, पंचवटीतील दत्तनगरमधील 57 वर्षीय महिला आणि गंजमाळच्या भीमवाडीतील 32 वर्षीय युवकाचा मृत्यु सोमवारी (ता. 22) रात्री उपचारादरम्यान झाला. तर, पखालरोडवरील 60 वर्षीय रुग्णाचा गेल्या रविवारी (ता.21), जुन्या नाशिकच्या चौक मंडईतील 67 वर्षीय रुग्णाचा गेल्या 11 तारखेला, अमरधार रोडवरील 85 वर्षीय रुग्णाचा गेल्या 17 तारखेला, फुलेनगरमधील 67 वर्षीय महिलेचा गेल्या रविवारी (ता.21) उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट मृत्युपश्‍चात प्राप्त झालेले आहेत. 

कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढलेत

गेल्या 3 जून रोजी मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारदरम्यान झालेला आहे. या रुग्णांचे कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट मृत्युपश्‍चात आलेले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी (ता. 23) कोरोनाची लागण झालेले 124 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मालेगावात पुन्हा 26 रुग्ण वाढले असून हे रुग्ण शहरातील भवानी चौक, टिळकनगर, टोकडेगाव, मौसम प्लाझा परिसरातील आहेत. तर, उर्वरित जिल्ह्यातील नांदगाव, कळवण, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, तळेगाव अंजनेरी (त्र्यंबकेश्‍वर), येवला आणि देवलाळी कॅम्प याठिकाणी प्रत्येकी एकेक आणि इगतपुरीत चार, निफाड तालुक्‍यात चांदोरी, सायखेडयात प्रत्येकी एकेक असे 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर, नाशिक शहरात रात्रीच्या अहवालापर्यंत 81 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये पंचवटीतील ओमनगरमध्ये दोन महिला, म्हसरुळमध्ये पुरुष, सिडकोतील राणेनगरमध्ये एक पुरुष, द्वारकेच्या संत कबीरनगर, पुष्पकनगर, जुन्या नाशिकमधील फुले मार्केटमध्ये 77 वर्षीय महिलेला लागण झाली. तसेच, आडगाव, पखालरोड, वडाळागाव येथेही कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. 

दोन परिचारिका व पुरुष कर्मचाऱ्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयातील तीन परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, मंगळवारी (ता. 23) जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका व पुरुष कर्मचाऱ्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे तिघेही सिव्हिलच्या कोरोना कक्षातील अतिदक्षता विभागातील आहेत. तर, नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागातील 11 कर्मचाऱ्याचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 22 कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांचे स्वॅब पाच दिवसांनी घेतले जाणार असून सध्या त्यांना गृह अलगीकरण करण्यात आलेले आहे.

हेही वाचा > धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड..जागीच ठार...कारण वाचून व्हाल थक्क..

 पंचवटी हॉटस्पॉट तर... 

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला आहे. फुलेनगर, हिरावाडी, दिंडोरीरोड, पेठरोड, रामवाडीपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तर, आता शहराच्या मध्यवस्ती असलेल्या टिळकवाडी, महात्मानगर, गंगापूर रोड, उपनगरला गांधीनगर, आडगाव या परिसरात नव्याने कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

हेही वाचा > अंत्यविधीची सुरू होती तयारी...अन् 'ती' एक बातमी येताच सगळ्यांनाच फुटला घाम..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen more patients have died due to corona in the district nashik marathi news