बनावट नोटरी करुन मत्सबिज केंद्र बळकविण्याचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

युनूस शेख
Wednesday, 30 September 2020

आर्थिक फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय नाशिकरोड यांना दिला. कंपनीने तयार केलेली बनावट नोटरीही १९ मार्च २०२० दाखल केली. नोटरीत जमीर यानी करंजवन आणि धुळे येथील दोन्ही मत्सबिज केंद्र कंपनीचे संचालक कमलेश ओझे यांना हस्तांतरीत केल्याचे नमुद केले होते. 

नाशिक : बनावट नोटरी करुन मत्सबिज केंद्र बळकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार जमीर अल्ताफ शेख (वय.४२, रा.वडाळारोड) यांची खोटी सही करुन बनावट नोटरी तसेच अन्य कागदपत्र तयार केल्याचे माहिती अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीतून उघड झाले. वाचा काय घडले?

असा आहे प्रकार

जमीर शेख यांनी २०१४ मध्ये राज्य सरकारचे करंजवन (ता. दिंडोरी) येथील मत्सबिज उत्पादन केंद्र मत्सबिज उत्पादनकरीता १५ वर्षासाठी भाडेतत्वावर घेतले. सहाय्यक आयुक्त आणि विभागीय प्रादेशिक उपायुक्त मत्सव्यवसाय नाशिक यांच्याशी त्याबाबत करारही करण्यात आला होता. दोन वर्षानंतर २०१७ मध्ये बिज खरेदी विक्रीच्या संदर्भातून ठाणे येथील ए. एस. ॲग्री ॲन्ड ॲक्वा एल.एल.पी संचालकांशी जमीर यांचा संपर्क झाला. तीन वर्ष त्यांच्यात बिज खरेदी-विक्रीचा व्यवसाय झाला. जानेवारी २०२० मध्ये कंपनीचे कमलेश महादेव ओझे (वय ४०) तसेच रफिक शेख दोघेही (रा. ठाणे) यांनी करंजवन येथे जमीर यांची भेट घेतली. ते चालवत असलेल्या मत्स केंद्रात भागीदारी द्यावी किंवा केंद्र भाडेतत्वावर द्यावे अशी मागणी केली. दोघांची मागणी त्यांनी फेटाळून लावली. केंद्र बळकावण्याच्या उद्देशाने दोघांनी जमीर यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय नाशिकरोड यांना दिला. कंपनीने तयार केलेली बनावट नोटरीही १९ मार्च २०२० दाखल केली. नोटरीत जमीर यानी करंजवन आणि धुळे येथील दोन्ही मत्सबिज केंद्र कंपनीचे संचालक कमलेश ओझे यांना हस्तांतरीत केल्याचे नमुद केले होते. 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

वकिलांच्या खोट्या शिक्क्यासह सहीचा वापर केल्याचे उघड 

६ जुलै २०२० मध्ये आयुक्त मत्सव्यवसाय मुंबई यांनी जमीर यांच्याशी झालेला करार रद्द केला. त्यानंतर त्यांनी उपायुक्त मत्स व्यवसायविभाग नाशिकरोड यांच्याकडून करार संदर्भातील माहिती, माहिती अधिकारात मागितली. त्यात बनावट सही करुन खोटी नोटरी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शिवाय नोटरी करणारे वकिलांच्या खोट्या शिक्क्यासह सहीचा वापर केल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जमीर यांनी नाशिकरोड पोलिसांना संपर्क करत घडलेल्या प्रकाराची माहिती देत गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of ones by fake notary nashik marathi news