शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : उपविभागीय कृषि अधिकारी

प्रमोद सावंत
Monday, 12 October 2020

जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी चार हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा नोंदणीची मुभा असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.

नाशिक/मालेगाव : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेंतर्गत (आंबिया बहार) सन २०२०-२१ साठी द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान, गारपीट या समाविष्ट धोक्यांसाठी विमा सुविधा उपलब्ध आहे. १६ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत अटी, शर्ती व अधिसुचित फळपिकाच्या हवामान धोके निष्कर्षानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. यात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील पिकासाठी लाभ घेणे ऐच्छिक आहे.

द्राक्ष फळपिकाचे उत्पादन क्षम वय दोन वर्षे व त्यापेक्षा जास्त फळबागांना विमा संरक्षण कवच लागु असेल. जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी चार हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा नोंदणीची मुभा असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे. या योजनेत अधिसुचित क्षेत्रात कुळाणे, भाडे पट्टीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह सर्व द्राक्ष उत्पादकांना भाग घेता येईल. आंबा बहारातील द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस (१६ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१) दैनंदिनी कमी तापमान (१ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१) करिता शेतकऱ्यांनी १६ हजार विमा हप्ता प्रति हेक्टरी भरावा. गारपीठसाठी (१ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१) या कालावधीसाठी प्रति हेक्टरी ५३३३ रुपये विमा आहे. शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकासाठीचा धोका ओळखून या योजनेत सहभागी व्हावे.  

 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fruit crop insurance scheme nashik marathi news