प्रशासनाचा माणुसकीशून्य कारभार! कोरोनाबाधित मृतदेहाची दिवसभर हेळसांड; नातेवाईकांचा प्रचंड संताप

किरण सूर्यवंशी
Wednesday, 23 September 2020

कळवण, सुरगाणा व पेठ या तीन तालुक्यांतील कोरोना रुग्णांसाठी या कोविड सेंटरची निर्मिती केली आहे. पन्नासपेक्षा अधिक रुग्ण येथे उपचार घेत आहेत. मात्र, दिवसभर मृतदेह पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यातच नातेवाइकांशी झालेल्या वादामुळे येथील अन्य रुग्णही भांबावले आहेत.

नाशिक : (अभोणा) येथील कोविड सेंटरमध्ये ग्रामपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ७४ वर्षीय रुग्णाचा मृतदेह दिवसभर पडून राहिला. अखेर त्यांच्या दोन्ही मुलांनी रात्री उशिरा स्वतः पीपीई किट उपलब्ध करून मृतदेह ताब्यात घेतला व खासगी ट्रॅक्टरद्वारे स्मशानभूमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. ग्रामपालिका प्रशासनाच्या माणुसकीशून्य कारभारामुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वाचा नेमके काय घडले?

मृतदेह व नातेवाइकांचीही प्रचंड हेळसांड​

अभोणा येथील चिंतामण कामळस्कर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. सोमवारी (ता. २१) सकाळी दहाला त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह स्वतंत्रपणे रॅप करून ठेवला. मात्र, मृतदेह कोण नेणार व अंत्यसंस्कार कसे होणार, याबाबत ग्रामपालिका प्रशासनाकडे मदत मागितली असता, कोणतीही मदत मिळाली नाही. दिवसभर टोलवाटोलवी करण्यात आली. ‘हे काम आमचे नाही, आम्हाला तेवढीच कामं आहेत का?’ अशी उत्तरे मिळाली. अंत्यसंस्कारासाठी साधे वाहनही दिले नाही. त्यामुळे मृतदेह व नातेवाइकांचीही प्रचंड हेळसांड झाली.

माणुसकीशून्य कारभाराचा सोशल मीडियावर जाहीर निषेध

कळवण, सुरगाणा व पेठ या तीन तालुक्यांतील कोरोना रुग्णांसाठी या कोविड सेंटरची निर्मिती केली आहे. पन्नासपेक्षा अधिक रुग्ण येथे उपचार घेत आहेत. मात्र, दिवसभर मृतदेह पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यातच नातेवाइकांशी झालेल्या वादामुळे येथील अन्य रुग्णही भांबावले आहेत. विशेष म्हणजे, कळवण येथील जिल्हा उपरुग्णालयाचे नोडल ऑफिसरांनी ३ सप्टेंबरलाच कोविड सेंटरमधील मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक पातळीवर कार्यवाही करण्याबाबतचे परिपत्रक येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून अभोणा येथे स्वतंत्र विद्युतदाहिनी व रुग्णवाहिका तत्काळ द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामपालिकेच्या माणुसकीशून्य कारभाराचा सोशल मीडियावर जाहीर निषेध होत आहे.

हेही वाचा >  गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

ग्रामपालिका प्रशासनाने याबाबत दुर्लक्ष करून माणुसकीला काळिमा फासला आहे. मृत रुग्णाच्या दोन्ही मुलांनी दिवसभर प्रशासनाकडे मदतीसाठी याचना करूनही, ग्रामपालिका व तालुका प्रशासनाने दाद दिली नाही. याचा आम्ही ग्रामस्थ जाहीर निषेध करतो. कोविडच्या नावाखाली नक्की किती खर्च झाला, याची चौकशी होऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन : रमेश चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral of a corona positive father by his son nashik marathi news