'महावितरणकडून दिरंगाई करणे थांबवा आता!; अभियंता दिनीच शेतकऱ्यांची 'अशी'ही गांधीगिरी

अजित देसाई 
Tuesday, 15 September 2020

मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पिकेही करपू लागली होती. कनिष्ठ अभियंता येवले यांच्याकडे वारंवार मागणी करूनही हे रोहित्र बदलवण्यासाठी त्यांच्याकडून पुरेशे प्रयत्न होत नाही अशी भावना येथील शेतकऱ्यांची झाली आहे.

नाशिक / सिन्नर ; नादुरुस्त रोहित्र वेळेत न बदलवणे, मंजूर वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणे, वीज कनेक्शन जोडणी न करणे, लोकांनी मांडलेल्या समस्याही न सोडवणे आदी गोष्टींना वैतागून  वडांगळीकरांनी आज (ता.15) अभियंता दिनाच्या दिवशीच महावितरण कंपनीच्या कक्ष कार्यालयात जात अभियंता आर.जे.येवले यांचा पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने सत्कार केला. 

वडांगळीच्या शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन
शेतकरी उत्तम खुळे, बापूसाहेब खुळे, बाळासाहेब खुळे, यशवंत आढांगळे, मिलिंद आढांगळे व इतर शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटरपंपसाठी वीजपुरवठा करण्यासाठी देवनदीलगत देवना शिवारात विजरोहीत्र बसवण्यात आले आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणचे रोहित्र सतत जळत असून त्या ठिकाणी दुरुस्ती केलेले रोहित्र बसविण्यासाठी महावितरण कंपनीकडून दरवेळेस दिरंगाई होत असते. तीन महिन्यात १५ दिवस देखील या ठिकाणाहून वीजपुरवठा होऊ न शकल्याने पिण्याचे पाणीही शेतकऱ्यांना दुरून आणावे लागत आहे.

वीज समस्या सोडवा

मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पिकेही करपू लागली होती. कनिष्ठ अभियंता येवले यांच्याकडे वारंवार मागणी करूनही हे रोहित्र बदलवण्यासाठी त्यांच्याकडून पुरेशे प्रयत्न होत नाही अशी भावना येथील शेतकऱ्यांची झाली आहे. अभियंता येवले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत  उत्तम खुळे, खंडेराव खुळे, विकास सोसायटीचे संचालक बापूसाहेब खुळे, बाळासाहेब खुळे, बाळू खुळे, यशवंत आढांगळे, मिलिंद आढांगळे  या शेतकऱ्यांनी त्यांचा आज अभियंता दिनाच्या दिवशी गांधीगिरी पद्धतीने पुष्पगुच्छ देत सत्कार केला.  येवले यांनी आपल्या कर्तव्याच्या आड येणारी मरगळ झटकून काम करावे व शेतकऱ्यांना झटपट न्याय द्यावा म्हणून आज त्यांचा सत्कार केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 

 सदर भागातील लोकांचे १०० केव्हीएचे रोहित्र फेल झालेले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीमुळे रोहित्र दुरुस्तीस अडचणी येत आहेत.वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून लवकरच बदलण्यात ते बदलून देण्यात येईल.  सिन्नर तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण खूप जास्त आहे. सिंगल फेजिंग काळात उलटा डीओ टाकून सिंगल फेजच्या मोटारी शेतकरी वापरत असल्याचे निदर्शनात येत आहे. यामुळे अपघात देखील होतात. वीज चोरी न करण्याचे आवाहन करूनही शेतकरी दुर्लक्ष करतात. - खैरनार , उपकार्यकारी अभियंता सिन्नर ग्रामीण ( महावितरण)

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gandhigiri of farmers with MSEDCL engineer nashik marathi news