चाकूचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी जेरबंद; संशयितांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

अरुण खंगाळ
Saturday, 26 December 2020

या संशयितांकडून पल्सर मोटारसायकल, धारदार हत्यार तसेच इतर मोबाईल असा एकूण एक लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. न्यायालयाने सर्व संशतियांना ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या संशयितांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

लासलगाव/विंचूर (जि.नाशिक) : काही दिवसांपासून चाकूचा धाक दाखवून रस्त्यावरील प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत टोळीस शुक्रवारी (ता.२५) लासलगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. या टोळीतील संशयितांकडून मोटारसायकल, धारदार हत्यार तसेच मोबाईल असा एकूण एक लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीने विंचूर व भरवस फाटा परिसरात मोठा धूमाकूळ घातला होता. 

एक लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त 
ब्रह्मणचारी पांडुचारी अवसली (रा. यल्लमागुडा, वडेपल्ली, तेलंगणा) गुरुवारी (ता.२४) रात्री नाशिक-औरंगाबाद मार्गावरील विंचूरकडून कामानिमित्त वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) येथे कारने (एपी ३५ टीव्ही ४७४५) येत असताना त्यांच्या मागून पल्सर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी गाडी आडवी लावत चाकूचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्याकडील ३० हजार रुपये, मोबाईल, एक हजारांची रोकड व एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल लांबविला. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश  

मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी कारला अडविले

याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलिस अमलदार उदयसिंग मोहारे, पोना घुगे, योगेश शिंदे, कैलास महाजन, प्रदीप आजगे, कैलास मानकर, संजय देशमुख यांचे पथक तयार करून यातील संशयिताचा शोध घेत असता येवला रोड भरवस फाटा (ता. निफाड) येथे गोरखनाथ झाल्टे (वय ३२, रा. वाघदर्डी, ता. चांदवड), रावसाहेब चव्हाण (२९, रा. निफाड), युवराज पवार (२४, निफाड) संशयास्पदरीत्या हालचाल करताना दिसले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता मोबाईल व पैसे मिळून आले.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

संशयितांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

या संशयितांकडून पल्सर मोटारसायकल, धारदार हत्यार तसेच इतर मोबाईल असा एकूण एक लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. न्यायालयाने सर्व संशतियांना ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या संशयितांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gang arrested lasalgaon police action nashik marathi news