नवरात्रोत्सवानंतर गोदाघाटावर निर्माल्याचा खच; अस्वच्छतेमुळे अधिकारी धारेवर 

योगेश मोरे
Tuesday, 27 October 2020

स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील परिसर स्वच्छ राखण्यासाठी महापालिकेने स्वच्छतेचे ठेकेदाराला कंत्राट देत साडेसातशे कामगार नियुक्त केले आहेत.

नाशिक/म्हसरूळ : शहरात स्वच्छता करण्यासाठी नाशिक महापालिकेने ठेकेदार नियुक्त करीत कंत्राटी स्वच्छता कामगार नियुक्त केले. असे असताना नवरात्रोत्सवानंतर गोदाघाटावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता व निर्माल्याचा खच पडून होता. पंचवटी प्रभाग सभापती शीतल माळोदे यांनी मंगळवारी (ता. २७) गोदाघाटावर पाहणी करीत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून येथील स्वच्छता करण्याचे आदेश दिले. 

स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील परिसर स्वच्छ राखण्यासाठी महापालिकेने स्वच्छतेचे ठेकेदाराला कंत्राट देत साडेसातशे कामगार नियुक्त केले. यातील रामकुंड आणि गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कामगार नेमण्यात आले. विजयादशमीला घरोघरी बसविलेले घट विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी गोदाघाट परिसरात निर्माल्य टाकले. हा खच दोन दिवस पडून असल्याने, रामकुंडासह जुने भाजी बाजार पटांगण, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण आदी ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली. यातच मंगळवारी सभापती शीतल माळोदे यांनी गोदाघाटावर पाहणी केली असता, हे चित्र पाहून माळोदे संतप्त झाल्या. त्यांनी स्वच्छता निरीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यापुढे या ठिकाणी कायम स्वच्छता ठेवण्याचे आदेश प्रभाग सभापती शीतल माळोदे यांनी दिले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage heaps on the banks of Godavari after Navratri nashik marathi news