ऑक्सिजन सिलेंडर अभावी गॅस वेल्डींग व्यवसाय ठप्प; व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

अंबादास देवरे 
Monday, 12 October 2020

कोरोना बाधितांच्या उपचाराकरीात जिल्ह्यात ऑक्सिजन सिलींडर्सची मागणी वाढली आहे. कोविडसेंटर्स सह, सर्व शासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटर्सची संख्या वाढल्यामुळे सहज मिळणाऱ्या सिलेंडर्ससाठी गॅसवेल्डिंग व्यावसायिकांना मागणीनंतर जादा दर देवूनही तब्बल महिनाभर वेटिंग करावी लागत आहे.

नाशिक/ सटाणा : बाजार भावापेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम देऊनही ऑक्सीजन सिलिंडर मिळत नसल्याने गॅस वेल्डिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसयिकांपुढे उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये पूर्ण व्यवसायच बंद झाल्यानंतर आता व्यवसाय काहीसा सुरू झाला असतानाच ऑक्सिजन सिलेंडरच्या वाढत्या मागणीमुळे या व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांचावर उपासमारीची वेळ आली आहे. 

जिल्ह्यात दोन हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह 

कोरोना बाधितांच्या उपचाराकरीात जिल्ह्यात ऑक्सिजन सिलींडर्सची मागणी वाढली आहे. कोविडसेंटर्स सह, सर्व शासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटर्सची संख्या वाढल्यामुळे सहज मिळणाऱ्या सिलेंडर्ससाठी गॅसवेल्डिंग व्यावसायिकांना मागणीनंतर जादा दर देवूनही तब्बल महिनाभर वेटिंग करावी लागत असल्याने व्यवसाय बंद ठेवल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर आवश्यक असून शासनाने व्हेंटिलेटरसाठी हे सिलेंडर आरक्षित केल्याने सर्वत्र ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक तालुक्यात सुमारे गॅस वेल्डिंगचा व्यवसाय करणाऱ्याची संख्या सरासरी ५० च्या आसपास आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे. 

ही कामे गॅस वेल्डिंगने होतात

गरजेनुसार लोखंड, पितळ, तांबे, बीड, अल्युमिनियम किंवा स्टेनलेसस्टील रॉड वितळवून गॅस वेल्डिंग केलं जातं. विहिरीत आडवे किंवा उभे बोअर करण्यासाठी वापरात येणारं कपलर, टूल वेल्डिंग हा महत्वाचा पार्ट गॅस वेल्डिंग शिवाय तयार होत नाही. दुचाकी किंवा चारचाकी वहानांचे तुटलेले चेंबर जोडणे, मशीन, हेड किंवा ब्लॉकला आटे पाडणे, तुटलेले भाग पूर्वववत करून जोडणे, ट्रॅक्टर ट्रॉलीच्या जाडपत्र्याचे ऑक्सिजन कटरच्या सहाय्याने कटिंग करून ट्रॉली बनविणे व कोणत्याही धातूच्या वस्तू किंवा सुट्या भागाला जोडून, घासून ती पूर्ववत तयार करणे अशी व ईलेक्ट्रिक वेल्डिंगवर होणारे सर्व जुनी नवी कामे गॅसवेल्डींग कारागीर करतात. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

व्यवसायिकांची कोंडी

या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या अशा सर्वच लहान व्यावसायिकांवर गेल्या २१ मार्च पासून उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्येक दुकादारास कामाच्या स्वरूपानुसार आठवड्यातून किमान एक सिलिंडर वापरासाठी लागतेच. मूळ पूरवठाधारकांकडून सिलेंडर मिळत नसल्याने आता या व्यवसायिकांची कोंडी झाली आहे. डिपॉजिट व सिलेंडरच्या भाड्यात वाढ करून दोन मिळून एक सिलेंडरमधील गॅस विभागून घेण्याची सक्ती पुरवठादार करतात. तरीही ७५० रुपयांना सहज मिळणाऱ्या या एका सिलिंडर साठी आता १५०० रुपये मोजूनही महिनाभर वेटिंग करावी लागल्याने गॅसअभावी धंदा बंद पडला आहे. दुकानाचेभाडे व वीजबिल भरनेही शक्य नसल्याने एकूणच गॅसवेल्डिंग व्यवसाय मोडीत निघाला आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

 

जगण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजन महत्वाचा असल्याने तुटवडा पडणारच या व्यवसायाला जोडधंदा शोधल्याशिवाय आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार नाही. - स्वप्नील गोसावी, व्यवसायिक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas welding business stalled due to lack of oxygen cylinder nashik marathi news