निवडणुकीपूर्वीच राजकारण आले रंगात! झंवर, बोरांमुळे नाशिकमध्ये गिरीश महाजन पुन्हा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

नाशिकमध्ये स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटर ग्रेस कंपनीचे झंवर यांच्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर वर्षभरापूर्वी मध्यान्ह्य भोजन योजनेचा ठेका देतानाही झंवर यांचे नाव चर्चेत आले होते.

नाशिक : बीएचआर पतसंस्थेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथील उद्योजक सुनील झंवर यांच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यामुळे झंवर यांचे नाशिकमधील बोरा नामक व्यक्ती व नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंध असल्याचे समोर आल्याने श्री. महाजन पक्षीयदृष्ट्या पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या समर्थकांकडून महाजन यांच्याशी संबंधित असलेल्या व भाजपच्या प्रत्येक निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेल्या बोरा नामक व्यक्तीवर वॉच ठेवला जात आहे. त्यातून निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलेच रंगू लागल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीपूर्वीच राजकारण आले रंगात

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला झंवर यांच्या कार्यालयातून माजी मंत्री महाजन यांच्या नावाचे लेटरहेड, कराराची काही कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे झंवर व महाजन यांचे संबंध उघड झाल्याने या प्रकरणाचे नाशिक कनेक्शन तपासून पाहिले जात आहे. नाशिकमध्ये स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटर ग्रेस कंपनीचे झंवर यांच्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर वर्षभरापूर्वी मध्यान्ह्य भोजन योजनेचा ठेका देतानाही झंवर यांचे नाव चर्चेत आले होते. राज्यात भाजपची सत्ता होती व महापालिकेत २०१७ पासून भाजपची सत्ता आहे. या काळात अनेक कंत्राटे देताना झंवर यांचे नाव चर्चेत आले होते. समृद्धी महामार्गाच्या कामावर मोठ्या प्रमाणात डंपर, जेसीबीची गरज असल्याने त्या कामावर बोरा नामक व्यक्तीकडून त्याचा पुरवठा झाला आहे.

विरोधकांकडून याचे भांडवल होण्याची दाट शक्यता

शहरात गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून बोरा नामक व्यक्तीला पुलाचे काम मिळाले आहे. स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रोजेक्ट गोदा प्रकल्पाचे काम याच लोकांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. हे दोघेही माजी मंत्री महाजन यांच्याशी संबंधित असल्याने बीएचआर पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारातून झालेल्या छापेमारीतून महाजन नाशिकमध्ये चर्चेत आले आहेत. पुढील वर्षाच्या अखेरीला नाशिक महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, त्या वेळी महाजन यांना प्रचारात सहभागी होताना विरोधकांकडून याचे भांडवल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

जळगावचे राजकारण नाशिककडे

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एकनाथ खडसे व गिरीष महाजन हे दोघेही कट्टर विरोधक आहे. महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या खडसे यांनी महाजन यांचे राजकीय साम्राज्य उद्‍ध्वस्त करण्याचा विडा उचलल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगावमधील अंतर्गत राजकीय कुरघोडींचा केंद्रबिंदू नाशिककडे सरकताना दिसत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan in discussion again in Nashik marathi news