५१ वर्षांत दहाव्यांदा 'हे' धरण पूर्णपणे भरले; दहाव्यांदा ‘ओव्हरफ्लो’! 

girnadam.jpg
girnadam.jpg

नाशिक / मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे असलेले गिरणा धरण बुधवारी (ता. १६) सायंकाळी उशिरा ‘ओव्हरफ्लो’ झाले. १९६९ ते २०२० या ५१ वर्षांत दहाव्यांदा धरण पूर्णपणे भरले. धरणाचे गुरुवारी (ता. १७) दोन दरवाजे एक फुटापर्यंत उघडण्यात आले असून, दोन हजार ४६८ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील कसमादेत जोरदार पाऊस झाल्यास धरणातून आणखी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

खानदेशमधील रब्बीचे क्षेत्र वाढण्यास मदत

गिरणा धरणाची साठवणक्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. प्रारंभी ९६ टक्के जलसाठा नियंत्रित करून दरवाजे उघडण्यात येणार होते. मात्र चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद या धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने दरवाजे उघडण्याऐवजी धरण भरून घेण्याचा निर्णय झाला. यापूर्वी १९७३, १९७६, १९८०, १९९४, २००४, २००५, २००६, २००७ व २०१९ असे नऊ वेळा धरण भरले होते. सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने खानदेशमधील रब्बीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर सकाळी फक्त दरवाजा क्रमांक १ मधून १२३८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. ठेंगोडा बंधाऱ्यावरून गिरणा नदीत ५६७, तर हरणबारी धरणातून मोसम नदीत २५१ क्यूसेक पाणी वाहत आहे. याशिवाय इतर नाल्यांचे पाणी नदीला मिळत आहे. धरणात दीड ते दोन हजार क्यूसेक पाणी जमा होत आहे. त्यामुळे दुपारनंतर दरवाजा क्रमांक ६ देखील एक फुटाने उघडण्यात आला. सायंकाळपर्यंत दोन हजार ४६८ क्यूसेक पाणी सोडले जात होते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

एक दिवस आधी धरण ‘ओव्हरफ्लो’ 
गेल्या वर्षी कसमादेसह संपूर्ण खानदेशात दमदार पाऊस झाला होता. गिरणा व मोसम या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहिल्या. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०१९ ला धरण पूर्ण भरले होते. या वर्षीदेखील सुरवातीपासूनच कसमादे पट्ट्यात चांगला पाऊस होत गेल्याने गिरणा व मोसमच्या पूरपाण्याने धरण लवकर भरण्यास मदत झाली. गेल्या वर्षापेक्षा एक दिवस आधी म्हणजे १६ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी उशिरा धरण ओव्हरफ्लो झाले. २००५ मध्ये २ ऑगस्टला धरण भरले होते. 

गिरणा धरणाचे पाणलोट क्षेत्र कसमादे परिसर आहे. या भागात पाऊस झाल्यास, तसेच गिरणा व मोसम नदीतील पूरपाण्याची परिस्थिती पाहून धरणातील पाणी सोडले जाईल. नदीकाठावरील रहिवासी व गावांनी सतर्क राहावे. -हेमंत पाटील, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग 
 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com