वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्‍के आरक्षण द्या - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील 177 वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमध्ये केवळ 3.8 टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे 27 टक्‍के आरक्षण द्यावे, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

नाशिक : केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील 177 वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमध्ये केवळ 3.8 टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे 27 टक्‍के आरक्षण द्यावे, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे.

उच्च शिक्षणापासून वंचित राहणार
 
श्री. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे, की शासनाने मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण बेकायदेशीररीत्या कमी केल्यास ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतील. देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी 66 हजार 333 जागांमधून ओबीसींच्या 27 टक्‍के आरक्षणानुसार दोन हजार 578 जागा आरक्षित असाव्यात. परंतु केवळ 371 जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून दिल्या आहेत. ही टक्केवारी केवळ 3.8 टक्के इतकी आहे. त्याखालोखाल एक हजार 385 जागा एससी (15 टक्के) आणि 669 (7.5 टक्के) जागा एसटी प्रवर्गाला त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवल्या आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी सात हजार 125 जागा ठेवल्या आहेत. अनारक्षित जागांची टक्केवारी 73.7 टक्के एवढी असल्याचे श्री. भुजबळांनी निदर्शनास आणले आहे.

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय

मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी 27 टक्के, एससी 15 टक्के व एसटी 7.5 टक्के असे घटनात्मक आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचे सर्व निकष, सूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी केवळ 371 जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. ओबीसींच्या वाट्याच्या दोन हजार 207 जागांसह एकूण सात हजार 125 जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे श्री. भुजबळांचे म्हणणे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे 27 टक्के आरक्षण देऊन महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या दोन हजार 578 जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give 27% reservation to OBCs in medical admissions - Chhagan Bhujbal nashik marathi news