ग्रामपंचायत निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात; प्रचारासाठी उरला अवघा एक दिवस

election_camp.jpg
election_camp.jpg

निफाड (नाशिक) : तालुक्‍यातील ६० ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात आला असून, प्रचारासाठी अवघा एक दिवस उरला आहे. गावकीच्या अन्‌ भावकीच्या लढाईच्या सत्तासंघर्षात भलेही दांडा कोणाचाही असला तरी झेंडा आपल्याच गटाचा, पक्षाचा असायला हवा यासाठी गावकीचे राजकारण शिगेला पोचले आहे. 

निवडणुकांचा फड चांगलाच रंगात

राजकीयदृष्ट्या सजग असलेला अर्धा निफाड तालुका तरुणाईच्या रणांगणातील आगमनाने ढवळून निघाला आहे. साठ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निफाड तालुक्यातील स्वयंभू नेतृत्व असलेल्या मातब्बरांना आपली गढी सांभाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा फड चांगलाच रंगात आला आहे. तालुक्यातील ओझर, लासलगाव, उगाव, नांदूरमध्यमेश्‍वर, शिवडी, सायखेडा यांसह तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाई उभी ठाकली आहे. अशातच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने प्रत्येक जागेवर लढणारा भावी सरपंच म्हणूनच मिरवू लागला आहे. विशेष म्हणजे पॅनलच्या नेतेमंडळींकडून सरपंच पदाचा शब्द सोडवून घेण्याचा अट्टाहासही अगोदरच केला जाऊ लागला आहे. 

मतदारापर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत

निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांबरोबरच जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे गावागावात आपल्या कार्यकर्त्यांच्या गटाला बळ देऊन तालुक्यातील ग्रामपंचायती कशा आपल्या पक्षाच्या ताब्यात येतील, याकडे सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींची रणनीती आहे. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव, शिवार, वाडी, वस्त्या ढवळून निघाल्या आहेत. अशातच अवकाळी पावसाचा व्यत्यय आला. त्यात निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे प्रचार काहीसा थांबला होता. प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी ग्रामपंचायत उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

सोशल मीडियावर धूम 

मतदारांनी आता आपल्या समर्थक मतदारांसाठी सोशल मीडियाचे ग्रुप बनवून त्याद्वारे प्रचाराची रणनीती आखली आहे. आपणच कसा गावाचा विकास करू शकतो, गावाचे माझ्याकडे कसे विकासाचे व्हिजन आहे, हे पटवून सांगण्यासाठी व्हिडिओ क्लिप, फेसबुक, व्हॉट्सॲपचा वापर करण्यात येत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com