ग्रामपंचायतींच्या रणधुमाळी! प्रतिष्ठेसाठी पैशांची पर्वा कशाला?पैशांचे वाटप, दारू अन् पार्ट्यांची धूम

एस. डी. आहिरे  
Thursday, 14 January 2021

पद, प्रतिष्ठेसाठी पैशांची पर्वा येथील उमेदवार करीत नाहीत. ग्रामपंचायत निवडणूक तर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीपेक्षा अधिक चर्चेची व खर्चाची असते. गावातील आपली शान, मान व पुढारपण मिळविण्यासाठी उमेदवारांचा खर्च लाखो रुपयांच्या घरात जातोय.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : निफाड तालुक्याचे राजकारण निवडणूक काळात अतिसंवेदनशील वळणार पोचते. पद, प्रतिष्ठेसाठी पैशांची पर्वा येथील उमेदवार करीत नाहीत. ग्रामपंचायत निवडणूक तर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीपेक्षा अधिक चर्चेची व खर्चाची असते. गावातील आपली शान, मान व पुढारपण मिळविण्यासाठी उमेदवारांचा खर्च लाखो रुपयांच्या घरात जातोय. सध्या त्या साठ गावांमध्ये उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दिले जाणारे वेगवेगळे प्रलोभने, आश्‍वासने, पैशांचे वाटप आणि दारू, पार्ट्यांची धूम असे चित्र दिसते. 

मर्यादेपेक्षा तिप्पट खर्च 
एक एक मतामागे उमेदवारांनी टाइट फिल्डिंग लावली आहे. लासलगाव, उगाव, नैताळे, शिरवाडे वणी अशा गावांमध्ये चुरशीच्या अन्‌ कमी फरकाचे निकाल हाती येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विजयासाठी ‘वाटेल ते’ अशी खूणगाठ उमेदवारांनी बांधली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात व नऊ सदस्यांची ग्रामपंचायत असेल तर प्रतिउमेदवाराची खर्चमर्यादा २५ हजार, ११ व १३ सदस्यांची ग्रामपंचायत असेल तर ३५ हजार व १५ ते १७ सदस्यांच्या उमेदवारीची खर्चाची मर्यादा ५० हजार इतकी आहे. कागदावर खर्चाची मर्यादा कमी असली तरी प्रत्यक्षात उमेदवारांचा खर्च हा लाखोंच्या घरात जातोय. मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील खर्चाला तर मर्यादाच नाही. पाण्यासारखा खर्च झाला तरी ग्रामपंचायतीत विजयी होण्यासाठी कोणतीही कसर उमेदवारांकडून सोडली जाताना दिसत नाही. साम- दाम- दंड अशी नीती उमेदवारांनी अवलंबली आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

पार्ट्या अन्‌ अर्थपूर्ण व्यवहार 
उमेदवारांचा कार्यकर्ता म्हटले, की त्याला जेवण-खाण्यापासून त्याच्या सर्वच गरजा पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी असते. कार्यकर्त्यांबरोबरच काही मतदारांचेही यात चोचले पुरवावे लागतात. ग्रामपंचायत निवडणूक म्हटले, की पार्ट्या आल्याच. सध्या उमेदवारांकडून अनेकांना विशेष पार्ट्या दिल्या जात आहेत. काही जणांनी तर हॉटेल, ढाबे बुकिंग करून ठेवले आहेत. आम्ही ज्यांना सांगतो किंवा ज्याच्याकडे कूपन देऊ त्यांना जेवण व बाटली द्या, बिल देऊन टाकू, असे फर्मान सुटले आहे. गावात अनेकांना गटागटाने पार्ट्या, हॉटेल, ढाब्यांवर जेवणावळी दिल्या जात आहेत. या पार्ट्यांचाच खर्च लाखो रुपयांमध्ये जातोय. शिवाय दारूचा सध्या महापूर असून, गावागावांतील कार्यकर्ते झिंगाट झाले आहेत. पुढील दोन दिवसांत तर प्रयोगशील मतदारांवर अर्थपूर्ण प्रयोग होईल. काठावरची मते आपल्याकडे वळविण्यासाठी कोणतीच कसर सोडली जात नसून, काय पाहिजे, किती पाहिजे, असे प्रश्‍न करून त्यांची इच्छा पूर्ण केली जात आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election wastage money for prestige nashik marathi news