ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू; अडसरे खुर्द येथील घटना

राम शिंदे 
Wednesday, 7 October 2020

स्विच स्टेशन वर असलेला त्याचा भाऊ ज्ञानेश्वर याने खूप वेळ झाला अजून गणेशचा आवाज नाही येत त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही म्हणून जोरात आवाज दिला पण काळोख्या अंधारात गणेश कुठे बेपत्ता झाला यासाठी ज्ञानेश्वर याने शोधमोहीम चालू केली

नाशिक : (सर्वतीर्थ टाकेद) इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत अडसरे खुर्द येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी गणेश जगण जाधव (वय २४) ग्रामपंचायत अडसरे खुर्द या गावच्या पाणीपुरवठा विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला. 

अशी घडली घटना

मृत कै गणेश जगण जाधव हा सोमवारी (ता. ०५ ) रात्री बाराच्या सुमारास कडवा नदी तिरी असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी त्याचा भाऊ ज्ञानेश्वर जाधव याला घेऊन गेला. काळोख्या अंधारात दोघेही भाऊ एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर होते. परंतु मोटार चालू झाली नसल्याने गणेशने मोटार चालू करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मोटार चालू होत नसल्याने गणेशने मोटारीची वायर तपासणी केली. दरम्यान मोटारीची वायर ही तुटलेली दिसताच गणेशने रात्रीच्या अंधारात पाण्यात उतरून वायर जोडण्याचा प्रयत्न केला. वायर जोडताना शॉर्ट सर्किट होऊन गणेशचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आणि मृतदेह हा नदीपत्रातील विहिरीच्या पाण्यात पडला.

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

अंधारात गणेश बेपत्ता झाला

स्विच स्टेशन वर असलेला त्याचा भाऊ ज्ञानेश्वर याने खूप वेळ झाला अजून गणेशचा आवाज नाही येत त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही म्हणून जोरात आवाज दिला पण काळोख्या अंधारात गणेश कुठे बेपत्ता झाला यासाठी ज्ञानेश्वर याने शोधमोहीम चालू केली. परंतु शॉक लागून पाण्याच्या तळाला पडलेला गणेश ज्ञानेश्वरला सापडत नव्हता. म्हणून ज्ञानेश्वर याने ग्रामपंचायत सरपंच भांगरे, उपसरपंच ज्ञानेश्वर मोंढे ,कचरू गिरंगे आणि काही ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांना ही बाब कळविली तोपर्यंत वेळ झाली होती रात्री तीन वाजेची. अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच भांगरे, उपसरपंच ज्ञानेश्वर मोंढे, सदस्य नामदेव भोईर, पोलीस पाटील अनिता गोसावी आदींसह पदाधिकारी वर्गाला कळताच सर्वांनी गावकाऱ्यांसोबत, वायरमन दौंड, त्तम साबळे, कचरू गिरंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत गणेशचा शोध घेतला. पहाटे 4 दरम्यान गणेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. गावकऱ्यांनी घोटी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अनिल धुमसे यांना ही माहिती कळविली व काही मिनिटांतच धुमसे यांनी, पोलीस कॉन्स्टेबल लहू सानप, पोलीस नाईक अशोक महाले, हवालदार सुनील मोरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास कार्यवाही चालू केली.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

गाववर शोककळा पसरली

गणेश जाधव यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवले, शवविच्छेदन अहवालातही शॉक लागून मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. त्यानंतर मंगळवार ता.०६ रोजी अडसरे खुर्द येथे गणेशचा अंत्यविधी करण्यात आला. सदर घटनेमुळे संपूर्ण जाधव परिवारासह अडसरे खुर्द ग्रामपंचायत गाववरती मोठी शोककळा पसरली आहे. सदर घटनेची प्रशासनाने दखल घेऊन गणेश च्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्व स्तरातून गावकाऱ्यांकडून केली जात आहे.

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat employee dies due to electric shock nashik marathi news