'देऊळ बंद'मुळे पंचवटीतील गाइड झाले विस्थापित! अनेकांनी शोधला नवीन रोजगार

Panchvati
Panchvati

पंचवटी (नाशिक) : कोणत्याही प्राचीन स्थळ, वारशाबाबत स्थानिकांना जेवढी माहिती असते, तेवढीच बाहेरून आलेल्या अनाहुतांना नसते. नेमकी हीच गरज हेरत प्रत्येक ठिकाणी गाइड (मार्गदर्शक) असतात. नाशिकचे प्राचीन महत्त्व सातासमुद्रापार असल्याने पंचवटी भागात मोठ्या प्रमाणावर गाइड अस्तित्वात होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या एप्रिलपासून शहराच्या धार्मिक पर्यटनाला लगाम बसल्याने पंचवटीतील बहुसंख्य गाइड रोजगाराअभावी अक्षरशः विस्थापित झाले आहेत. पूर्वी पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणावर गाइड अस्तित्वात होते. पंचवटी पोलिसांनी त्यांना अधिकृत परवानेही दिले होते, असे एकूण ७५ गाइड कार्यरत होते. मात्र एप्रिलपासून इतर आस्थापनांप्रमाणेच देऊळबंदी झाल्याचा फटका त्यांना बसला आहे. 


स्वयंघोषित गाइडमुळे पर्यटकांची दिशाभूल 

शहराला अतिशय प्राचीन अशी पौराणिक ओळख आहे. त्यामुळे पंचवटीतील काळाराम, गोरारामासह सीतागुंफा, कपालेश्‍वर, तपोवन आदी भागांत देशभरातील पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. पूर्वी रस्त्याने पायी फिरून पर्यटकांना मार्गदर्शक करणारे गाइडचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होते. अलीकडे अनेक स्वयंघोषित गाइड अस्तित्वात आले असून, त्यांच्याकडून शहरात धार्मिक पर्यटनासाठी आलेल्यांची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे. 

ऑटोगाइडची भर 

कधीकाळी पंचवटीत ७५ गाइड अस्तित्वात होते. हे गाइड पर्यटक भाविकांना पायी फिरवून येथील मंदिरे, त्यांचा इतिहास, तपोवनातील गोदाकपिला संगम, राम सीतामाईची राहण्याची जागा याबाबत माहिती देत. त्यासाठी ते परव्यक्ती दहा रुपये शुल्क आकारत. अलीकडे ऑटोगाइड ही संकल्पना नव्याने अस्तित्वात आली असून, संबंधित रिक्षाचालक पाच-सहा व्यक्तींना रिक्षात बसवून पंचवटीतील मंदिरांसह तपोवन आदी ठिकाणे दाखवितात. यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून साधारण शंभर रुपये आकारले जातात, परंतु यातील अनेकांना पंचवटीतील धार्मिक माहिती नसल्याचा आक्षेप गाइडच्या संघटनेने घेतला आहे. काही लोक भाविकांना चुकीची माहिती देत असल्याचे काही गाइडसने सांगितले. 

महिला गाइड अस्तित्वात 

पंचवटी भागात पुरुष गाइडबरोबरच महिला गाइडही अस्तित्वात आहे. गेल्या कुंभमेळ्याच्यावेळी शांताराम अवसरे पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी पुरुष गाइडबरोबरच महिला गाइडलाही सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात धार्मिक पर्यटनासाठी पुरुषांबरोबरच महिला पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. अशा महिलांशी महिला गाइड अधिक चांगला संपर्क ठेवू शकतो, हीच गरज हेरत पंचवटीतील ज्योती जोशी यांना त्यांनी गाइडचे काम करण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे, तर व्यवसायासाठी आवश्‍यक बिल्ला देत अन्य महिलांना या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा सल्लाही दिला. मात्र सध्या पुरुष गाइडलाच काम नाही, तेव्हा महिला गाइडला कोण विचारतो, असा प्रश्‍न सौ. जोशी यांनी केला. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

काही काळापूर्वी पंचवटीत मोठ्या संख्येने गाइड अस्तित्वात होते, ते पायी फिरून भाविक पर्यटकांना मंदिरांसह अन्य माहिती देत. मात्र, दहा महिन्यांपासून सर्वच ठप्प आहे. 
- श्रीकांत जोशी, अध्यक्ष, पंचवटी गाइड संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com