Covid2019 : कोरोनामुळे एकीकडे "नो चिकन"! अन् "इथे" मात्र घरोघरी चिकन टिक्‍क्‍याची धूम!

chicken tikka at malegaon 1.png
chicken tikka at malegaon 1.png

नाशिक/मालेगाव : "कोरोना' व्हायरसच्या भीतीमुळे शाकाहार वाढून मांसाहार कमी झाला आहे. पोल्ट्री व्यवसायाला फटका बसला आहे. ब्रॉयलर कोंबडीचे दर 15 दिवसांत 70 टक्के घसरले. 120 ते 160 रुपये किलोचे चिकन अवघे 40 रुपये किलोने मिळत आहे. शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भागात सर्रास चिकनवर ताव मारला जात आहे. दर घसरल्याने घरोघरी चिकन टिक्‍क्‍याची धूम आहे. 

घरीच बनतोय चिकन टिक्का 
भाव कमी झाले असले, तरी हॉटेल, उपाहारगृहांमध्ये किलोभर टिक्‍क्‍यासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबीयांनी घरीच चिकन टिक्का बनविण्यास पसंती दिली आहे. 40 रुपयांचे चिकन व दहा रुपयांचा मसाला असा एकूण 50 रुपयांत टिक्का तयार होतो. चिकनला मसाला लावून तो अर्धा तास भिजवून ठेवतात. त्यानंतर तेलात तळून खवय्ये त्यावर ताव मारतात. येथील चिकन दुकानांवर रोज मोठी गर्दी होत आहे. मटणाच्या भावापेक्षा चिकन अगदीच नगण्य किमतीत मिळत असल्याने ही संधी अनेक जण साधत आहेत. 

मालेगावाच्या पूर्व भागात चिकन टिक्‍क्‍याची धूम 
ग्रामीण भागात 50 ते 60 रुपये किलो चिकन मिळत असले, तरी मागणीत 50 टक्के घट झाली आहे. मात्र, शहरातील पूर्व भागात खवय्यांनी या अफवेला महत्त्व दिले नाही. चिकनचा या भागावर फारसा परिणाम झालेला नाही. 70 ते 80 टक्के खवय्ये चिकनवर ताव मारत आहेत. 15 दिवसांपूर्वी हॉटेल, उपाहारगृहांमध्ये चिकन टिक्का 150 ते 160 रुपये किलोने मिळत होता. चिकनचे दर घसरल्याने हा भाव सध्या 80 ते 100 रुपये किलोवर आला आहे. 

मिळेल त्या किमतीत त्यांना कोंबड्या विकाव्या लागताएत
मालेगाव शहर खवय्ये म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातही येथील मांसाहार अनेकांच्या पसंतीला उतरतो. गेल्या महिन्यात शहरातील पूर्व भागात चिकनचे दर 120 रुपये, तर पश्‍चिमेकडे 160 रुपये होते. पूर्व भागात दोन महिन्यांपासून भाव स्थिर होते. "कोरोना'चा चिकनशी संबंध जोडून अफवा पसरताच चिकन विक्रीवर सर्वत्र परिणाम झाला. पोल्ट्री व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला. मात्र, शहर त्यात अपवाद ठरले. कसमादे परिसरात शेकडो बेरोजगार तरुणांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. तयार झालेल्या पक्ष्यांना अफवांमुळे मागणी नसल्याने मिळेल त्या किमतीत त्यांना कोंबड्या विकाव्या लागत आहेत. 

माफक दरातही मिळतोय नफा

घाऊक विक्रेत्याकडून तीस रुपये किलोप्रमाणे कोंबडी मिळत आहे. पीस व इतर घाण जाऊन 40 रुपये किलोने चिकन विक्री परवडते. ग्राहक मोठ्या प्रमाणावर असल्याने माफक दरातही नफा मिळत आहे. सध्या चिकन टिक्‍क्‍याला मोठी पसंती असून, भाव कमी असल्याने चिकनला मागणी वाढली आहे. कोरोनासंदर्भातील अफवेचा चिकनवर फारसा परिणाम शहरात नाही. -शाहरुख अन्सारी, चिकन विक्रेते, मालेगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com